जामनेर तालुक्यात सर्वाधिक ८२.४५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:34+5:302021-01-17T04:14:34+5:30
जळगाव : जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ८२.४५ टक्के मतदान जामनेर तालुक्यात झाले तर सर्वात कमी ६७.९६ टक्के ...
जळगाव : जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ८२.४५ टक्के मतदान जामनेर तालुक्यात झाले तर सर्वात कमी ६७.९६ टक्के मतदान भुसावळ तालुक्यात झाले. विशेष म्हणजे यंदा महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले असून दोघांच्या मतदानाच केवळ १.७० टक्केचाच फरक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
गावगाडा चालविण्यासाठी व ग्रामीण भागात प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचयात निवडणूक यंदा कोरोनामुळे चांगलीच लांबली. कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला व अखेर ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. यामध्ये जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर माघारी दिवसापर्यंत ९३ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या होत्या. शुक्रवार, १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यामध्ये जिल्हाभरात सकाळपासूनच मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला.
गिरीश महाजन यांच्या तालुक्यात सर्वाधिक मतदान
जिल्ह्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह होता तरी सर्वाधिक ८२.४५ टक्के मतदान हे गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात झाले. त्या खालोखाल रावेर तालुक्यात ८१.९७ टक्के मतदान झाले. अशाच प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यात ८१.८१ टक्के, चाळीसगाव तालुक्यात ७९.२९ टक्के, पारोळा तालुक्यात ७८.८५ टक्के, बोदवड तालुक्यात ७८.८१ टक्के, जळगाव तालुक्यात ७८.४६ टक्के, अमळनेर तालुक्यात ७७.७७ टक्के, पाचोरा तालुक्यात ७७.४८ टक्के, चोपडा तालुक्यात ७७.४१ टक्के, धरणगाव तालुक्यात ७७.०७ टक्के, यावल तालुक्यात ७७.०३ टक्के, भडगाव तालुक्यात ७५.४३ टक्के मतदान झाले. सर्वात कमी ६७.९६ टक्के मतदान भुसावळ तालुक्यात झाले.
महिला मतदारांचाही उत्साह
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले. एकूण सहा लाख २९ हजार ३९४ महिला मतदारांपैकी चार लाख ८६ हजार ५४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच सहा लाख ८२ हजार ४४३ पुरुष मतदारांपैकी पाच लाख ३८ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिला मतदारांची टक्केवारी ७७.२२ टक्क्यांवर पोहचली तर पुरुष मतदारांची टक्केवारी ७८.९२ टक्क्यांवर पोहचली. महिला व पुरुष मतदारांच्या टक्केवारीत केवळ १.७० टक्केचाच फरक आहे.
इतर मतदारांचे केवळ २० टक्के मतदान
जिल्ह्यातील महिला व पुरुष मतदारांसोबतच १० इतर मतदार आहेत. सर्वाधिक सहा इतर मतदार पाचोरा तालुक्यात असून चाळीसगाव तालुक्यात दोन व जळगाव आणि पारोळा तालुक्यात प्रत्येकी एक इतर मतदार आहेत. यापैकी मात्र केवळ पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातून प्रत्येकी एक इतर मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे त्यांची ही टक्केवारी केवळ २० टक्केच आहे.