भुयारी मार्गासाठी रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:14 AM2021-01-18T04:14:26+5:302021-01-18T04:14:26+5:30
या अपघातात तरुणाचा बळी गेल्याने संतप्त रहिवाशांनी ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...
या अपघातात तरुणाचा बळी गेल्याने संतप्त रहिवाशांनी ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग प्राधिकरणाचे (नही) चंद्रकांत सिन्हा यांना आताच घटनास्थळी बोलवा, तातडीने गतिरोधक टाका व महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग झाला पाहिजे, समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आदी प्रकारच्या घोषणा देऊन रहिवाशांनी यंत्रणेला धारेवर धरले. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे निरीक्षक प्रतापसिंह शिकारे, वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर व सहकाऱ्यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र सातत्याने होणारे अपघात व त्यामुळे लोकांचे जीव जात असल्याने हा विषय मार्गी लागलाच पाहिजे या मागणीवर रहिवासी आक्रमक झाले होते.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
हा अपघात ज्या ठिकाणी झाला तेथून जवळच दोन शाळा आहेत. त्यामुळे महामार्ग ओलांडूनच विद्यार्थ्यांना जावे लागते. या भागात दर आठवड्याला अपघात होत असून त्यात कुणी किरकोळ तर कुणी गंभीर जखमी होते. त्याशिवाय अधूनमधून जीवदेखील जात असल्याने भीतीचे वातावरण आहे. महामार्ग बायपास होत असला तरी त्याला अजून वेळ आहे. त्यामुळे इच्छादेवी चौक, रिलायन्स पेट्रोल पंप व कालिंका माता चौक आदी ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावा यासाठी पाठपुरावा करूनही विषय मार्गी लावला जात नसल्याचे आंदोलक मुश्ताक शेख यांनी ‘लोकमत’ ला सांगितला.
सहायक पोलीस अधीक्षकांकडून आश्वासन न मिळाल्याने पुन्हा आंदोलन
सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी आंदोलन करणाऱ्यांना महामार्गावरून उठण्याबाबत विनंती केली. त्यानुसार सर्व आंदोलक हटले व मुश्ताक शेख व इतरांनी त्यांच्याशी चर्चा केली. हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याने आपण आश्वासन देऊ शकत नाही, असे सांगितल्यावर आंदोलक पुन्हा महामार्गावर आले. तुम्ही आंदोलन केले तर आम्ही कारवाई करू, असा इशारा दिल्यानंतर शिकारे व इतर अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून समजूत घातली. यानंतर जिया बागवान, रियाज बागवान, अक्रम पटेल व इतरांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. याबाबत सोमवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेण्याचे निश्चित झाल्याची माहिती मुश्ताक शेख यांनी दिली.