महामार्गाच्या बायपासचे काम वर्षभरात पुर्ण होण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:23+5:302021-01-01T04:11:23+5:30
जळगाव : शहराला वळसा घालून जाणाऱ्या बायपासचे काम आता वेगाने सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात या बायपासच्या कामाचा वेग ...
जळगाव : शहराला वळसा घालून जाणाऱ्या बायपासचे काम आता वेगाने सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात या बायपासच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र आता पुन्हा हे काम वेगाने सुरू झाले आहे.
तरसोद ते फागणे हे काम जळगावच्या राष्ट्रीय प्राधिकरण महामार्गाच्या अंतर्गत येते. त्यामुळे हा टप्पा ८७.३ किमीचा आहे. त्यामुळे या कामासाठी अडीच वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्या काळात हा प्रकल्प पूर्ण होणार नसल्याने त्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे पाठण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकदम १०२१ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्याचे काम आता वेगात सुरू असून, आव्हाणे, तरसोद शिवारातील कामांना वेग आला आहे. ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनानुसार हे काम आता वर्षभर चालणार आहे. २०२२च्या जानेवारी महिन्यात या ठेकेदाराला मिळणारी नवी मुदतदेखील संपेल. त्यामुळे तोपर्यंत हा बायपास वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.
हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. सद्य स्थितीत या महामार्गाचेही चौपदरीकरण केले जात आहे. त्यामुळे शहरात समस्या उद्भवल्या आहेत.
महामार्गाचे चौपदरीकरण ठरले शाप
शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. हरयाणाच्या एका ठेकेदाराने ही निविदा घेतली असून, काम सुरू आहे. मात्र, त्यातून होणारे अपघात काही थांबण्याचे नाव घेत नाहीत आणि अद्यापही कामाला हवा तसा वेग येत नाही. कोविडच्या काळात काम बंद होते. आता पुन्हा काम सुरू झाले आहे. मार्च २०२१मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या या मार्गावर दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक येथे भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.
चेंज ऑफ स्कोपचा वाद
महामार्गाचा ठेका ६८ कोटी १० लाख रुपयांत देण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये नंतर बदल झाल्यास १० टक्के रक्कम ही वापरता येते. त्यानुसार चेंज ऑफ स्कोपची दहा टक्के रक्कम ही ६.८ कोटी रुपये होते. या रकमेत सालार नगर, अग्रवाल चौक आणि शिव कॉलनी येथे भुयारी मार्ग करून देण्याचे आश्वासन खासदार उन्मेश पाटील यांनी दिले होते. मात्र, या रकमेत हे तीनही भुयारी मार्ग बसणार नाहीत. याचा विचार त्यावेळी कुणीही केला नाही. आता या रकमेत फक्त शिव कॉलनी येथेच भुयारी मार्ग होणार आहे, तर अग्रवाल चौकात फक्त एक बॉक्स बसवला जाणार आहे. सालार नगर येथे भुयारी मार्गासाठी जवळपास १३ कोटी रुपये लागणार आहेत.