महामार्ग चौपदरीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:32+5:302021-07-26T04:16:32+5:30
दुरुस्तीची राष्ट्रवादी मागणी : महामार्ग प्राधिकरणाला निवेदन नशिराबाद : तरसोद ते भुसावळ महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र त्यात ...
दुरुस्तीची राष्ट्रवादी मागणी : महामार्ग प्राधिकरणाला निवेदन
नशिराबाद : तरसोद ते भुसावळ महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र त्यात रस्ते, गटारी, पूल यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळं नागरिकांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चुकीच्या बांधकामाची आताच दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महामार्ग चौपदरीकरणात दोन्ही बाजूला झालेल्या सर्व्हिस रोडलगत काँक्रीट गटार बनवण्यात आली आहे. गटार बांधकाम करताना वाहनधारकांना अडचणीच्या वेळेस उपयोगात येणारा फुटपाथ न ठेवता डांबरीकरणाच्या बाजूला काँक्रीट गटार असल्याने अपघाताचा धोका आहे. दोन्ही बाजूंना फुटपाथ निर्माण करण्यात यावा. सर्व्हिस रोड करताना रस्त्यावरील पाणी वाहून नेण्यासाठी केलेली काँक्रीट गटार चुकीच्या पद्धतीने झाली आहे. रस्त्यालगत असलेल्या शेतीचा व शेतीच्या बांधावरील नाल्यांचा नैसर्गिक पाऊस पाणी पाहून नेण्याच्या क्षमतेचा विचार झाला नाही. शेती शिवारातील बांधावरच या नाल्याची खोली खाली असून, गटार बांधकामावर करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतशिवारातील पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गावालगत अत्यंत चुकीच्या पद्धतीने गटार बांधकाम झाल्यामुळे गावाजवळ पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. स्थानिक प्रशासनास पाणी मार्गी लावण्यासाठी मोठा त्रास होत आहे. पूर्वी जुना महामार्ग असताना पोलीस स्टेशन रस्ता जवळील पूर्व-पश्चिम पाणी मार्ग लागण्यासाठी ब्रिटिशकालीन मोरीच्या खालच्या स्तरावरील तळ आज पूर्व-पश्चिम पाणी मार्ग लावण्यासाठी केलेला महामार्गाने केलेला मोरीचा तळ यात सुमारे चार ते पाच फुटाची तफावत आहे त्यामुळे पाणी तुंबून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळीच उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे. सुनसगावकडे जाणारा महामार्ग भुयारी मार्गाचे बांधकाम चुकीच्या जागेवर झाल्याचे निदर्शनास येते. या मार्गावरून सुनसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर न येता सर्व्हिस रोडवर रस्त्याचा मार्ग असल्याने पुन्हा बाजूला जाऊन सुनसगाव रस्त्यावर वाहनधारकांना यावे लागते. प्रत्यक्ष जागेवर उभे राहिल्यास भुयारी मार्गाचे बांधकाम चुकीचे असल्याचे निदर्शनास येते. यावर तोडगा काढावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर पंकज महाजन यांची स्वाक्षरी आहे.