महामार्ग चौपदरीकरणात सा.बां. विभागाच्या निवासस्थानावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:28 PM2020-06-21T12:28:09+5:302020-06-21T12:28:49+5:30
कर्मचाऱ्यांना निवासस्थान खाली करण्याच्या सूचना
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे सा.बां. विभागाचे इच्छादेवी चौकातील कर्मचारी निवासस्थाने पाडण्यात येणार असून यासाठी तेथील रहिवासी कर्मचाऱ्यांना हे निवासस्थाने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे (नही) सहा वर्षापूर्वीच वर्ग झाल्याने ‘नही’ने ही जागा मोकळी करून देण्याची मागणी केली होती. त्यासाठी सा.बां. विभागाला यासाठी २५ लाख रुपयांचा मोबदलादेखील देण्यात आला आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून शहरातून जाणाºया महामार्गाच्या बाजूच्या जागा मोकळ््या करण्यात येत आहेत. यात प्रभात चौकातील सिग्नल काढण्यात आले. या कामात इच्छादेवी चौकातील सा.बां. विभागाचे कर्मचारी निवासस्थाने अडथळा ठरत आहेत. या ठिकाणी चार निवासस्थाने असून ती खाली करण्यासंदर्भात नहीने सा.बां. विभागाला कळविले आहे.
भंडारगृह, मजुरांच्या रहिवासाचा जागांचा निवासस्थान म्हणून उपयोग
शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले त्या वेळी हे काम सा.बां. विभागाकडून करण्यात आले होते. त्यावेळी साहित्य ठेवण्यासाठी भंडारगृह व मजुरांसाठी खोल्या उभारण्यात आल्या होत्या. महामार्गाचे काम झाल्यानंतर ही जागा रिकामी असल्याने तेथे सा.बां. विभागाच्या कर्मचाºयांसाठी निवासाची सोय करण्यात आली. मात्र नंतर हा महामार्ग २०१४-१५मध्ये ‘नही’कडे हस्तांतरीत करण्यात आला. त्यामुळे आता चौपदरीकरणात सा.बां. विभागाचे हे निवासस्थाने येत असल्याने ही जागा मोकळी करून देण्याचे नहीने सा.बां. विभागाला कळविले. त्यानुसार या निवासस्थानातील कर्मचाºयांना निवासस्थाने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘नही’ने दिला मोबदला
ही निवासस्थाने पाडायची असल्याने त्यासाठी सा.बां. विभागाने नहीकडे मोबदल्याची मागणी केली. त्यानुसार नहीने यासाठी २५ लाख रुपयांचा मोबदला दिला आहे.
आठ-दहा दिवसात हातोडा
चौपदरीकरणासाठी ही निवासस्थाने खाली करावीच लागणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. या ठिकाणी आठ-दहा दिवसात काम सुरू होणार असून तत्पूर्वी ती खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही अधिकाºयांनी सांगितले.
कर्मचाºयांसाठी पर्यायी निवासस्थान
इच्छादेवी चौकातील निवासस्थानामध्ये असलेल्या कर्मचाºयांना सा.बां. विभागाच्या इतर निवासस्थानांचा पर्याय सूचविण्यात आला आहे. कर्मचाºयांच्या वर्गवारीनुसार त्यांना ही निवासस्थाने असल्याचे सा.बां. विभागाचे म्हणणे आहे.
शिल्लक जागेत निवासस्थानाची विनंती
महामार्ग चौपदरीकरणात निवासस्थानाची जागा शिल्लक राहत असेल तर त्या जागेत निवासस्थाने राहू द्या, अशी विनंती नहीला करण्यात आल्याचे सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले. जागा शिल्लक राहिली तर तेथे अतिक्रमाणाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे निवासस्थाने राहिल्यास कर्मचारी राहू शकतील व अतिक्रमणही होणार नाही, या दृष्टीने पर्याय सूचिविला असल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी धास्तावले, सहा महिन्याच्या मुदतीची मागणी
निवासस्थाने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. इच्छादेवी चौकात चार निवासस्थाने असून तीन निवासस्थानांमध्ये चौकीदार, शिपाई, माळी असे तीन कर्मचारी व त्यांचे कुटुंब गेल्या १० वर्षांपासून राहत आहे. आता निवासस्थाने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या व लगेच दोन-तीन दिवसात निवासस्थाने सोडणे शक्य नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. यात एका जणाचा अपघात झाला असून लगेच कोठे जावे, असा प्रश्न कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे. जी निवासस्थाने दिली जात आहे, ती एकदम लहान असल्याने तेथे कसे राहावे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. निवासस्थाने खाली करायची असल्यास किमान सहा महिन्यांची तरी मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिकाºयांच्या भेटीगाठी
निवासस्थाने खाली करण्याच्या सूचना दिल्यानंतर कर्मचाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेऊन मुदत मिळावी, अशी मागणी केली. मात्र त्यांनी मागणी ही अमान्य करण्यात आल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.
महामार्गाची जागा ‘नही’कडे वर्ग झालेली असल्याने ही निवासस्थाने चौपदरीकरणासाठी खाली करावी लागणार आहे. तशा सूचना कर्मचाºयांना दिल्या आहेत. कर्मचाºयांना त्यांच्या वर्गवारीनुसार निवासस्थाने दिली जातील.
- प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सा.बां. विभाग