हिंगोणा येथील पाणी प्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 03:13 PM2019-05-12T15:13:23+5:302019-05-12T15:15:19+5:30
हिंगोणा येथील पाणीप्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी गंभीर दखल घेतली. पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावल येथील पाणीपुरवठ्याशी संबंधित अधिकारी तसेच जळगावी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली.
हिंगोणा, ता.यावल : येथील पाणीप्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी गंभीर दखल घेतली. पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावल येथील पाणीपुरवठ्याशी संबंधित अधिकारी तसेच जळगावी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध केले होते.
हिंगोणा येथे पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत असून, संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आणून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले व प्रशासक बसवावा, अशी मागणी केली होती. याची दखल आमदार जावळे यांनी घेतली व स्वत: हिंगोणा येथे येऊन ग्रामपचायतीच्या कार्यकारी मंडळाशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर हिंगोणा गावाच्या पाणी समस्येबाबत चर्चा केली. बंद असलेली गावातील जलस्वराज विहीर खोलीकरण करणे, वनविभागाची ट्यूबवेल अधिग्रहीत करणे आणि राष्ट्रीय पेयजल योजना लवकरात लवकर कार्यरत करणे तसेच मुख्य टाकीखाली अंडरग्राउंड टाकी (स्टोरेज टँक) बांधणे अशा सूचना दिल्या.
दरम्यान, याआधी ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त महिलांनी लावलेली कुलूप काढण्यात आले.
यावेळी सरपंच सत्यभामा भालेराव, श्याम महाजन, भरत पाटील, अरमान तडवी, मनोज वायकोळे, उमेश भालेराव, बाळू कुरकुरे, महेंद्रसिंग पाटील, रवींद्र जावळे आदी उपस्थित होते.
हिंगोणा गावातील पाणी समस्या ही गंभीर आहे. पाण्याची तीव्रता ही आठवडेभरात कमी होईल. यासाठी मी स्वत: जातीने लक्ष देणार आहे. लवकरात लवकर पाणी प्रश्न मार्गी लावेल व त्यासाठी ग्रामस्थांनी कार्यकारी मंडळाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
-हरिभाऊ जावळे, आमदार, रावेर-यावल