मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळ्याचा ऐतिहासिक तलाव नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 05:43 PM2019-04-29T17:43:11+5:302019-04-29T17:45:51+5:30
दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
चंद्रमणी इंगळे
हरताळे, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव : दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावा करूनही अपयश येत असल्याची स्थानिकांची व्यथा आहे. परिणामी तलावावर उपजीविका करण्यात येणारा शेती, मासेमारी व पशुपालन व्यवसायही संकटात आला आहे.
सलग पाच वर्षांपासून तलावात ठणठणाट असल्याने संपूर्ण तलावात इंग्रजी बाभळीचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याऐवजी संपूर्ण तलावात काटेरी झुडपांमुळे जंगल तयार झाले आहे. तलावाने संपूर्ण क्षेत्रात बकाल स्वरूप धारण केले आहे. दुरुस्तीऐवजी तलावाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. शासनाने भविष्याचा विचार करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी आताच काटेरी झुडपे काढून दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.
हरताळे तलावालगत पुरातन असे श्रावणबाळ समाधी मंदिर आहे.
गत वेळेस प्रशासनाच्या लक्षात आणूनदेखील कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी संबधित विभागाला तलावाच्या दुरवस्थेसंदर्भात सांगण्यात आले आहे. दुरुस्तीसंदर्भात आतापासूनच पावले उचण्याची गरज आहे.
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी भरावही टाकून पिंचिंग करणे, विस्तारीकरण व खड्डे बुजवून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. भरावाला पडणाऱ्या खड्ड्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
शेकडो वर्षांच्या पुरातन तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळेच तलाव कोरडा पडण्याची वेळ आली आहे. इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत तलावाचे सौदर्य खुलविण्यासाठी केवळ गप्पागोष्टी ऐकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पूर्ततेची अजूनही वाटच पहावी लागत आहे. नवसांजवणीचेही स्वप्न भंगले आहे. सलग पाच वर्षांपासून तलावात ठणठणाट असल्याने गावातील सर्वसामान्य माणसालादेखील तलावाबाबत उदासीनतेमुळे खेद व्यक्त होत आहे.
गावाकडील भागाचे काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गावाकडील भागात किमान पावसाचे पाणी साठवणसाठी काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तलावाची दुर्दशा कायम असल्याने त्यावर विसंबून शेती व्यवसाय, मासेमारी व्यवसाय पशुधन विकास बंद पडले असून रोजगार निर्मिती नष्ट झाली आहे.
शासन एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी लाखो रुपये खर्च करते. परंतु येथे शाश्वत असलेल्या नैसर्गिक तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांकडून काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मागणी केली आहे. मासेमारी सोसायटीचे चेअरमन एस. ए. भोई यांनी तलाव कोरडा पडण्याची चिंता करीत पारंपरिक मासमारी व्यवसाय नष्ट झाल्याने खंत व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेला निवेदन देणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.