जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 03:26 PM2019-10-21T15:26:16+5:302019-10-21T15:26:20+5:30

वाघूर नदीच्या पात्रात फरशी पुलाचे काम रखडल्याने सामूहिक निर्णय

Hivari Digar villagers boycott voting | जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Next



पहूर, ता.जामनेर : हिवरीदिगर, ता.जामनेर येथील ग्रामस्थांना जाण्यासाठी वाघूर नदीच्या पात्रात फरशी पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी सामूहिक निर्णय घेऊन मतदानावर सोमवारी बहिष्कार टाकला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना समजविले पण ग्रामस्थ निर्णयावर ठाम राहिले.
पहूर पासून पाच कि.मी अंतरावर हिवरीदिगर गाव असून गावाच्या मधून वाघूर नदीचा प्रवाह आहे. तर गावाच्या पश्चिम बाजूला केवडेश्वर नाला आहे. या नाल्याची फरशी छोटी आहे. नदीला व नाल्याला पूर आल्यावर हिवरी गावाचा संपर्क हिवरखेडा दिगर व पहूर या गावांशी होत नाही. यावर्षी दमदार पाऊस होत असल्याने वाघूर नदीला चार महिन्यांपासून पुराचे पाणी अधूनमधून सुरू आहे. तर अजिंठा डोंगरात पाणी पडल्यावर वाघूरच्या पाणी पातळीत अचानक वाढ होत आहे. गेल्या महिनाभरापूर्वी शारदा दिपक पांढरे, सोहम दिपक पांढरे, सार्थक पांढरे, रोहित पाटील सम्राट मोरे, विनोद मोरे हे वाघूर पात्रातून जिवघेणा प्रवास करीत असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेने यांचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे. नदीला पाणी असल्याने येथील शाळकरी मुले चारमहिन्यांपासून शाळेत गेले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. वर्षेभरापासून कोण गामसेवक आहे. याची कल्पना आम्हाला नाही. पिण्याचे पाणी भर पावसाळ्यात महिनाभरापासून मिळत नाही. वाघूर नदीच्या पात्रात फरशी पुलाची मागणी पंचवीस वर्षे जुनी आहे. लोकप्रतिनिधींविषयी आमचा संताप आहे. फक्त आश्वासने दिली जात आहे. अशा स्वरूपात संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
फरशीला मंजुरी
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने वाघूर नदीच्या पात्रात फरशी पुलाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चार कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. तर दुस-या टप्प्यात या फरशी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी दिली आहे.
प्रशासनाकडून समजूत
मंडळ अधिकारी एस.एस.पवार, तलाठी सुरज बिकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढून मतदान करण्यासाठी विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी ही विनंती अमान्य करून आमचा रोष लोकप्रतिनिधींवर आहे, प्रशासनावर नाही, असे सांगितले. तर जि प सदस्य अमित देशमुख यांनी गावक-यांशी चर्चा केली पण निष्फळ ठरली आहे.
हिवरखेड्यात मतदान केंद्र
हिवरीदिगर येथे तिनशे पन्नास मतदार असून होणा-या प्रत्येक निवडणुकीत येथील ग्रामस्थ वाघूर नदी ओलांडून हिवरखेडा दिगर येथे मतदान केंद्रावर मतदान करीत आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने वाघूरच्या पाणी पातळीत आचनक वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारी हिवरखेडा दिगर येथे मतदानासाठी दहा किलोमीटर फेरी घालून पहूर मार्गे वाहनाने जावे लागणार असल्याने नागरिक संतप्त झाले. या गैरसोयीमुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावात साधा पहिलीचा वर्ग सुध्दा नाही. काही वर्षांपूर्वी येथे मतदान केंद्र ठेवण्यात येत होते. कालांतराने केंद्र बंद करण्यात आले आहे.
‘लोकमत’चा पाठपुरावा
सर्वात अगोदर ‘लोकमत’ने हिवरीदिगर गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतून करावा लागतो जिवघेणा प्रवास ही बातमी ३१ जुल ैरोजी प्रकाशित करून वास्तव समोर आणले आहे. नंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फरशी पुल मंजूर याची सत्यता २ आॅगस्ट रोजी प्रकाशित केली आहे.

 

Web Title: Hivari Digar villagers boycott voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.