हिवरीचा युवक बुलडाण्याजवळ धरण परिसरातून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 09:28 PM2019-12-01T21:28:41+5:302019-12-01T21:28:48+5:30
शोधकार्य सुरू : पहूर येथून नातेवाईक रवाना
पहूर, ता.जामनेर : तालुक्यातील हिवरी दिगर येथील युवक बहिणीकडे बुलडाणा येथे गेला असता येळगाव धरण परिसरातून शनिवारपासून बेपत्ता झाला आहे. धरणाजवळील विहिरीवर त्याचे कपडे व मोबाईल आढळून आल्याने नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.
रहिवासी सागर रघुनाथ पाटील हा युवक बुलढाणा येथील त्याच्या बहिणीकडे गेला होता. शनिवारी दुपारी घराच्या बाहेर पडला असता पावणे चार वाजता धरणावर जात असून उशीर होईल, असा संदेश त्याने बहिणीला पाठविला. त्यानंतर बहीण व पाहुणे यांनी धरणाकडे जाऊन पाहिले असता धरणाजवळ त्याचे कपडे, मोबाईल आढळून आले. मात्र सागर आढळला नाही. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. रविवारी माहिती मिळताच पहूर येथील नातेवाईक रवाना झाले असून सागरचे शोधकार्य सुरू आहे.
बहीण शीतल पाटील व पाहुणे प्रदिप पाटील यांनी सायंकाळी पाच वाजता बुलढाणा शहराजवळ असलेल्या एळगाव धरणावर जाऊन परिसरात शोध घेतला असता तिथे सागरचे कपडे, मोबाईल धरणातील एका विहीरीवर आढळून आले आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सागरचे शोधकार्य सुरू आहे. याबाबत बुलढाणा शहरातील पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.
शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, आर.बी.पाटील, रमेश पाटील व डॉ. डी.एन.पाटील होळकर यांनी रविवारी बुलढाणा येथे जाऊन घटनास्थळी शोध घेतला. एक दिवस उलटूनही सागरचा तपास लागत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत. अहमदनगरहून सोमवारी पाणबुड्यांचे पथक पाचारण करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे. हिवरीतील स्वभावाने गरीब परीवारातील सागर हा एकुलता एक मुलगा असून तीन बहिणी आहेत, अशी माहिती मिळाली.