अभ्यासगट नेमण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:24 AM2019-12-11T00:24:56+5:302019-12-11T00:25:57+5:30
अभ्यासगट नेमण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे १० रोजी होळी करण्यात आली.
पारोळा : अभ्यासगट नेमण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे १० रोजी होळी करण्यात आली.
राज्यातील खाजगी प्राथमिक शाळा व कर्मचारी यांच्याबाबत वेगवेगळे जाचक अभ्यास गट नेमण्याचा आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी ४ डिसेंबर रोजी निर्गमित केला. त्याला महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पुणे येथील राज्य कार्यकारिणी सभेत जाहीर विरोध करून सदर आदेशाची उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होळी करून शिक्षण आयुक्तांनी हा आदेश रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष हेमंत भीमराव पाटील यांनी दिला. यावेळी मुख्य सचिव कां. रं.तुंगार, ज्येष्ठ नेते पा. बा.पाटील, जलीम देशपांडे, तांबोळी, शरद थिटे आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्र संपविण्याचा घाट हा सुरू आहे. विद्यार्थी संख्येवर शिक्षकांचे पगार हे चुकीचे धोरण यात आहे. यामुळे ग्रामीण भागातील शाळा संपतील. तसेच विद्यार्थी संख्येसाठी शिक्षणात चढाओढ निर्माण होईल. यातून शिक्षण क्षेत्राला ग्रहण लागेल. हा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यभरातून महासंघाच्या माध्यमातून जिल्हा निहाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा राज्य उपाध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिला आहे.