संतप्त महिलांकडून वीज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 08:57 PM2019-05-30T20:57:56+5:302019-05-30T20:58:02+5:30

वाढीव बिल भरुनही वीजपुरवठा खंडित : वीज वितरण कार्यालयाजवळच केला निषेध

Holi of electricity bills from angry women | संतप्त महिलांकडून वीज बिलांची होळी

संतप्त महिलांकडून वीज बिलांची होळी

Next

भुसावळ : वीज वितरण कंपनीकडून सध्या वाढीव वीज बिल येत आहेत. वीज ग्राहक वाढीव वीज बिलाचा भरणा करीत असतानादेखील वीज वितरण कंपनीकडून पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शहरातील महिला संतप्त झाल्या. त्यांनी बुधवारी सकाळी १० वाजता वीज वितरण कंपनीच्या शहरातील तापीनगरातील कार्यालयासमोर वाढीव वीज बिलांची होळी करून कारवाईचा निषेध केला. दरम्यान, ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
वाढीव वीज दराप्रमाणे वीज बिलाचा भरणा करून देखील वीजपुरवठा खंडित करून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या भुसावळ येथील महावितरण व कर्मचाऱ्यांच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे अनेक नागरिकांवर उपवासमारीची वेळ आली आहे.
अचानक बिल वाढीचा भुर्दंड आणि त्यावर भर उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे त्रस्त झालेल्या शहरातील महिला वर्गाने आपला संताप व्यक्त केला.
या संतप्त महिलांनी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.
संतप्त महिलांनी एकत्र येऊन बुधवार रोजी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालयासमोर विजबिले जाळून त्याची होळी केली.
भुसावळ शहरातील सखी श्रावणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री नेवे यांनी सर्व महिलांनी वाढीव वीज बिल, वीज बिल भरूनदेखील पुन्हा आलेले वाढीव बिल, विनाकारण विद्युत पुरवठा (कट) खंडित करणे, वीज दर आकारणी मध्ये प्रभागानुसार तफावत दाखवणे, नुकतेच मागील वर्षी बदलविलेले वीजमीटर पुन्हा बदलणे अशा विविध माध्यमातून ग्राहकांना वेठीस धरून हैराण करणे असा प्रकार महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी चालविला आहे, असा आरोप केला आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी आकडे टाकून वीजचोरी होत आहे. तेथे डोळे झाक केली जाते. अधिकारी आणि कर्मचारी गरिबांच्या मागे हात धुवून हेतुपुरस्करपणे लागत असल्याचा आरोप महिलांनी केला.
बंद घरातील वीजमीटरचे सुद्धा बिल दिले जाते, याला काय म्हणावे, अश्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत या महिलांनी वीजबिले जाळून निषेध व्यक्त केला.
वीज वितरण कंपनीने तातडीने ग्राहकांना वितरित केलेली वाढीव बिले लवकरात लवकर कमी करून द्यावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या महिलांनी प्रसंगी दिला आहे.
मारहाण प्रकरण मिटले
थकित वीज बिलाचा भरणा उशिरा केल्याने महेंद्र कुमार यांची कोणतेही सबब न ऐकता वीज कनेक्शन कट करण्यात आले होते. त्यांनी मी नियमित वीज बिल भरणा करतो तरी सुद्धा तुमची कारवाई योग्य नाही. लगेच बिल भरतो,असे सांगितले तरी सुद्धा कनेक्शन कट करण्यात आले व नंतर दंडाची आकारणी केल्यानंतर जोडणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी या विषयावरून कुंभार व वीज वितरणचे कर्मचारी अजय पाटील यांच्यात वाद झाला होता. बुधवारी कुंभार यांच्या घरासमोर दुचाकी लावल्या वरून पुन्हा शाब्दिक चकमक झाली व स्थिती हात उगारण्या पर्यंत गेली, अजय पाटील यांनी सांगितले की वरिष्ठांच्या या आदेशाचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे. ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर कर्मचारी व वीज ग्राहक कुंभार यांच्यात आपसामध्ये समोपचार घडविण्यात आला. दोघेही पोलिसात गेले, मात्र वाद मिटविण्यात आला.

Web Title: Holi of electricity bills from angry women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.