बालक-पालकांचा पहिल्या दिवशी सावध पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:10+5:302020-12-09T04:12:10+5:30
जळगाव : कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्याथ्याचे स्वागत करण्यात आले. कोरोनाचे सावट त्यातच भारत बंदची हाक ...
जळगाव : कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्याथ्याचे स्वागत करण्यात आले. कोरोनाचे सावट त्यातच भारत बंदची हाक यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी बालक व पालकांमध्ये काहीशी धाकधुक होती. काही शाळांमध्ये विद्याथ्यावर पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.
सोमवारी सकाळपासून शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वर्ग स्वच्छ करण्यासाठी कर्मचा-यांची लगबग सुरू होती. ही लगबग सायंकाळपर्यंत सुरू होती़ मंगळवारी सकाळी सात वाजेपासून शाळा उघडल्या. काही शाळा दुपारी बारानंतर उघडल्या.त्यामुळे सकाळी देखील फवारणी करून वर्गांचे निर्जंतुकीकरण केले जात होते. शाळेचा पहिल्या दिवस असल्यामुळे कन्या, प्रगती, प.वि.पाटील विद्यालय, नुतन महाविद्याल, मु़ जे महाविद्यालसह इतर शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी शाळेत सकाळीच दाखल झाले होते.
पुन्हा शाळा गजबजली
शाळांमध्ये विद्यार्थी दाखल होण्यास सुरूवात होताच, त्यांचे प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग व हात सॅनिटाईज केले जात होते. विद्यार्थ्यांनी गुरूजींचे चरणस्पर्श केल्याने उपस्थित शिक्षक भाउक झाले. प्रत्येक वर्गाबाहेर सॅनिटाईजर ठेवण्यात आले होते. तर एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात आला होता. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक करण्यात आले होते. सुरूवातीला शाळेत आल्यानंतर तपासणीसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळली जावी म्हणून सर्कल आखण्यात आलेले होते.
शाळांमध्ये केवळ चार तासिका
गणेश कॉलनी परिसरातील प्रगती विद्यालयात नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग केले जात होते. नंतर हात सॅनिटाईज करून त्यांना फिजिकल डिस्टन्सिंग राखून वर्गात बसवण्यात आले. यावेळी शाळेच्या संस्थेचे चेअरमन पी.बी.ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, प्रगती माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा पाटील, प्रगती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे, प्रगती बालवाडीच्या मुख्याध्यापिका ज्योती कुळकणी तसेच शिक्षक मनोज भालेराव आदी उपस्थित होते. चार तासिका घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्ग गजबजून गेले होते.
विद्यार्थिनींवर पुष्पवृष्टी
लुंकड कन्या शाळेत पहिल्या दिवशी शंभर विद्यार्थिनींनी हजेरी लावली. या विद्यार्थिनींवर पुष्पवृष्टी करून शिक्षकांनी स्वागत केले. प्रत्येक विद्यार्थिनींकडून पालकांचे संमतीपत्र शिक्षकांकडून गोळा करण्यात येत होते. यावेळी मुख्याध्यापिका साधना भालेराव, अनिल सैंदाणे, लीना कुळकर्णी, भगवान पाटील, वंदना तायडे, साहेबराव बागुल, वैशाली पाटील, मनिषा भादलीकर, वैभव देसाई, दीपक आर्डे, शिवाजी सोनवणे, जयश्री माळी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सुरूवातीला भीती, नंतर आनंद
शाळा व महाविद्यालयात येताना विद्यार्थ्यांच्या चेह-यावर सुरूवातीला भीती होती. मात्र शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्र मैत्रिणीसमवेत संवाद साधल्यानंतर या विद्यार्थ्यांची भीती दूर झाली. मु.जे. महाविद्यालय व नुतन मराठा महाविद्यालयांना सुध्दा सुरूवातीला थर्मल स्क्रिनिंग व हात सॅनिटाईज करून प्रवेश दिला जात होता. दोन्ही महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर हजेरी घेतली जात होती. तर बॉक्समध्ये संमतीपत्रे गोळा केली जात होती. दोन्ही महाविद्यालयांना अल्प प्रतिसाद बघायला मिळाला.