मुस्लीम बांधवांंच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारी प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 03:33 PM2020-04-22T15:33:36+5:302020-04-22T15:34:55+5:30
मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शनानंतर शनिवार, दि.२५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.
सय्यद लियाकत
जामनेर, जि.जळगाव : मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शनानंतर शनिवार, दि.२५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात येणारे हे रोजे रोजेदारांची चांगलीच कसोटी पाहणारे ठरणार आहेत. एरवी रमजानचा महिना म्हटलं की प्रार्थनांचा महिना, पवित्र महिना, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये भाविकांची गर्दी व उत्साह दिसून येतो. यंदा मात्र कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रथमच रमजानच्या महिन्यात मशिदीही सुन्यासुन्या दिसणार आहेत.
मुस्लीम समाजामध्ये वर्षाच्या १२ महिन्यांपैकी रमजानचा महिना विशेष पवित्र मानला जातो. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ कुराण अवतरीत झाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक मुस्लीम स्त्री पुरुषांवर धर्मानुुसार ज्या पाच गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे रमजान महिन्याचे ३० रोजे (उपवास) ठेवणे बंधनकारक आहे. वर्षाच्या प्रत्येक ऋतूत १२ महिने येणारे हे रोजे मागील दोन वर्षांपासून उन्हाळ्यात येत आहेत. उन्हाळ्यातील रोजे हे रोजेदारांची खरी कसोटी पाहणारे ठरत असतात. कारण रोजा ठेवल्यानंतर संपूर्ण दिवसभर तब्बल १४ तास अन्नपाण्यावाचून राहावे लागते. ऋतू कोणताही असो मुस्लीम समाजातील सात वर्षाच्या मुलांपासून आबालवृद्ध रोजे धरतात. रमजान महिना म्हटला की, पहाटेच्या सहरपासून संध्याकाळी इफ्तारपर्यंत भाविकांच्या उत्साहाला एकच उधाण आले असते. मात्र यावर्षी रमजानच्या महिन्यावरही कोरोनाचे सावट असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तरीही आपापल्या घरात राहून रमजानमधील सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी तयारी केली आहे.
संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वांनी लॉकडाऊन पाळायचे आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी रमजानचे रोजे ठेवून या महिन्यातील विशेष नमाज तरावीसह सर्व नमाज वेळेवर घरातच पार पाडायच्या आहेत. अल्लाहने आपल्याला यावर्षी पवित्र महिन्याच्या इबादतीसाठी भरपूर वेळ दिला आहे. त्याचा सदुपयोग करून रोजा, नमाज कुराण पठण, जकात आदी धार्मिक विधी भक्तीभावांनी सर्वांनी अदा करावेत. तसेच गरीब बांधवांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनाही मदत करून अधिकचे पुण्य कमवून घ्यावे.
-मौलाना इम्रान मजाहेरी, जामनेर
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे मुस्लीम बांधवांनी रमजानचे रोजे ठेवून घरातच नमाज पार पाडावी व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संपूर्ण देशातून या महामारीचा लवकरच नायनाट व्हावा, म्हणून सर्वांनी या महिन्यात विशेष दुआ करावी.
-प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर
मुस्लीम बांधवांच्या रमजान महिन्याची सुरुवात २५ एप्रिलपासून होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये व लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
-अरुण शेवाळे, तहसीलदार, जामनेर.