घरफोडी केली अन् बायकोने घटस्फोट घेतला; अट्टल गुन्हेगार भुऱ्याची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:16+5:302021-04-02T09:47:41+5:30

इंदूर शहरात कुटुंबासह वास्तव्याला असताना २०१५मध्ये भुऱ्याने पहिली चोरी केली. त्यानंतर त्याचे लग्न झाले.

Crime Story of Bhurya; Home burglary and wife divorced! | घरफोडी केली अन् बायकोने घटस्फोट घेतला; अट्टल गुन्हेगार भुऱ्याची कहाणी

घरफोडी केली अन् बायकोने घटस्फोट घेतला; अट्टल गुन्हेगार भुऱ्याची कहाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात पोलीस थेट घरापर्यंत आले. नवऱ्याचे प्रताप पाहून संतापलेल्या बायकोने थेट त्याच्याशी घटस्फोट घेतला. पोलिसांकडून अटक आणि बायकोचा घटस्फोट यामुळे त्याने त्यातून बाहेर न पडता, आणखी घरफोडी करण्याचा निर्णय घेतला. कारागृहात त्याला आणखीन साथीदार मिळाले. ही कहाणी आहे अट्टल गुन्हेगार पवन उर्फ भुऱ्या रामदास आर्य (३४, रा. इंदूर) याची.

आयोध्या नगर येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी भुऱ्याला जालना येथून ताब्यात घेतले. गुरुवारपर्यंत तो पोलीस कोठडीत आहे. सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील व तपासी अंमलदार विजय नेरकर यांनी भुऱ्याला बोलते केले असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. एकट्या महाराष्ट्रात त्याच्याविरुद्ध घरफोडीचे १८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास करत असताना त्याने चोरलेले सोने कारेगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील सराफाला कमी किमतीत विकल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन २४ ग्रॅम सोने हस्तगत केले.

२०१५मध्ये पहिली घरफोडी

इंदूर शहरात कुटुंबासह वास्तव्याला असताना २०१५मध्ये भुऱ्याने पहिली चोरी केली. त्यानंतर त्याचे लग्न झाले. संसार सुरळीत सुरू असताना एके दिवशी पोलीस थेट घरी धडकले. नवऱ्याने घरफोडी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे प्रताप पाहून पत्नीने त्याला तडकाफडकी घटस्फोट देत सोडचिठ्ठी दिली.

कारागृहात गिरवले घरफोडीचे धडे

भुऱ्या इंदूरच्या कारागृहात असताना तेथे राजस्थानच्या एका गुन्हेगाराशी त्याची ओळख झाली. तोदेखील घरफोडीच्या गुन्ह्यात अट्टल होता. भुऱ्याने तेथेच घरफोडी करण्याचे धडे गिरवले. कारागृहात दोघांनी महाराष्ट्रात घरफोडी करण्याचा निर्णय घेतला. तेथून बाहेर पडताच महाराष्ट्र व मध्य प्रदेशात दोघांनी धूम माजवली.

चोरलेल्या कार सोडल्या रस्त्यात

भुऱ्या व त्याच्या साथीदाराने सांगली येथून कार चोरली होती. ही कार घेऊन ते दोघेही मागील आठवड्यात शिर्डी येथे गेले. तेथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पुढे ते अहमदनगरला गेले. एका घरात घरफोडी करताना कारची चावी आढळली. ही कार चोरुन दोघेही दोन्ही कार घेऊन गोव्याला जात असताना रत्नागिरीजवळ एका मित्राने फोन करून ‘तुझ्या मागावर पोलीस आहेत. कार व तू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहेस’, अशी माहिती दिली. यामुळे अहमदनगर येथून चोरी केलेली गाडी त्यांनी रत्नागिरीला सोडली. त्यानंतर दुसरी कार कर्नाटकच्या सीमेवर सोडली. गोव्यात मौजमस्ती केल्यानंतर महाराष्ट्रात परत येत असताना जालना पोलिसांनी भुऱ्याला ताब्यात घेतले. दरम्यान, २०१५मध्ये त्याला पहिली अटक झाली होती तर २७ डिसेंबर २०१९मध्ये तो इंदूर कारागृहामधून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्रात चोरीचा सपाटा सुरू केला.

Web Title: Crime Story of Bhurya; Home burglary and wife divorced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.