यंदा धान्याच्या होम डिलीवरीत १० टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:04+5:302021-04-18T04:15:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढत्या कोरोनाच्या संसर्गासह सूर्यनारायणही आग ओकू लागल्याने सध्या धान्य खरेदीसाठी बाजारपेठेत न जाता घरपोच ...

Home delivery of foodgrains increased by 10 per cent this year | यंदा धान्याच्या होम डिलीवरीत १० टक्क्यांची वाढ

यंदा धान्याच्या होम डिलीवरीत १० टक्क्यांची वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढत्या कोरोनाच्या संसर्गासह सूर्यनारायणही आग ओकू लागल्याने सध्या धान्य खरेदीसाठी बाजारपेठेत न जाता घरपोच धान्य मागविण्याकडे कल वाढत आहे. गेल्यावर्षी बाजारपेठेतील एकूण खरेदीच्या १० ते १५ टक्के धान्य घरपोच मागविले जात असताना यंदा हे प्रमाण थेट २५ ते ३० टक्क्यांवर पोहोचले आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनाचा संसर्ग वाढला व त्यामुळे अनेक गोष्टी ऑनलाईन होऊन वर्षभरातच सर्वच क्षेत्रांत मोठे बदल दिसून येत आहेत. यामध्ये धान्य खरेदीतही ट्रेण्ड बदलत असून अनेक जण बाजारपेठेत न जाता दूरध्वनी करून घरपोच धान्य मागवित आहेत. विशेष म्हणजे, धान्य खरेदीच्या या हंगामात उन्हाचेही चांगलेच चटके जाणवतात. त्यामुळे आता तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याकडे अधिक कल दिसून येत आहे.

मार्च-एप्रिल या महिन्यात वर्षभराचे धान्य खरेदी करून ठे‌वले जाते. यामध्ये अनेक जण बाजारपेठेत जाऊन स्वत: धान्याची पारख करीत ते खरेदी करतात. मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून काडी-कचरा काढलेले धान्य बाजारात मिळू लागल्याने केवळ कोणत्या प्रकारातील गहू, तांदूळ हवे हे ठरवून ग्राहक ते खरेदी करीत आहेत. ऐन धान्य खरेदीच्या हंगामात गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर यंदाही याच काळात हा संसर्ग वाढल्याने बाजारपेठेत भीती कायम आहे.

गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न

कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने वेगवेगळे निर्बंध लावले जात आहेत. असे असले तरी बाजारपेठेत गर्दी असते. यात जळगावातील बाजारपेठेत बाहेरगावाहून माल घेऊन येणारी वाहने व खरेदीसाठी इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांची वाहने अधिक असल्याने अनेकांच्या मनात संसर्गाची भीती आहे. त्यामुळे बहुतांश जण आता धान्य खरेदीसाठी बाजारात जाणे टाळून घरपोच धान्य मागवित आहेत. या दिवसात जळगावात दररोज शेकडो टन धान्याची विक्री होते. यामध्ये एका दुकानदाराकडे दिवसभरात १०० ग्राहक येणारे असतील, त्यापैकी गेल्यावर्षी १० ते १५ टक्के ग्राहकांनी घरपोच धान्य मागवित होते. यंदा हेच प्रमाण २५ ते ३० टक्क्यांवर पोहोचले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वाढत्या उन्हाची प्रशासनाला साथ

कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोबतच उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून सध्या तापमान ४२ अंशावर पोहोचल्याने अनेक जण बाजारपेठेत न जाता घरपोच धान्य मागवित आहेत. एकूणच कोरोनाचा संसर्ग व वाढते ऊन यामुळे धान्य खरेदीत घरपोच मागविण्याचे प्रमाण वाढत आहे.

—————————-

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने व ऊनही मोठ्या प्रमाणात तापत असल्याने अनेक जण धान्य खरेदीसाठी बाजारपेठेत येणे टाळत असून घरपोच धान्य मागवित आहेत. यात गेल्या वर्षी १० ते १५ टक्के असलेले हे प्रमाण यंदा २५ त ३० टक्क्यांवर पोहोचले आहे.

- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.

Web Title: Home delivery of foodgrains increased by 10 per cent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.