होमक्वारंटाईन रुग्णाचा रस्त्यावर मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:27+5:302021-04-28T04:18:27+5:30
जळगाव : रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी मोहीम पोलिस व महापालिकेकडून सुरू असून यात बहिणाबाई उद्यानाजवळ तपासणी एक धक्कादायक बाब ...
जळगाव : रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी मोहीम पोलिस व महापालिकेकडून सुरू असून यात बहिणाबाई उद्यानाजवळ तपासणी एक धक्कादायक बाब समोर आली. २२ तारखेला कोरोना बाधित आलेला एक ३५ वर्षीय तरूण हा बाधित असताना बिनधास्त रस्त्यावर फिरत असल्याचे समोर आले. वडिल सिव्हीलला ॲडमीट असून आपण त्यांना डबा देत होतो व स्वत: होमक्वारंटाईन असल्याचे त्याने सांगितले. त्याला पुन्हा कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले.
बहिणाबाई उद्यानासमोर १०७ जणांची तपासणी करण्यात आली यात २ जण बाधित आढळून आले. एक रुग्ण दुचाकींवर धान्याची पोती घेऊन जात होता. त्याची तपासणी केली असता तो बाधित आढळून आला.मात्र, आपण लसीचे दोन डोस घेतले आहे. त्यामुळे काही होणार नाही, असे सांगता हा रुग्ण कोविड केअर सेंटरला दाखल झाला. दरम्यान, एक तरूणाची तपासणी करीत असताना त्याने स्वत:हून बाधित असल्याचा रिपोर्ट डॉक्टरांच्या हातात ठेवला. त्याच्याकडे वाहनही नव्हते. त्यामुळे तो रिक्षातून प्रवास करीत असावा हा रुग्ण पोदार स्कूलकडे राहत असल्याचे त्याने सांगितले.
शहरात नवे १६३ रुग्ण
शहरात मंगळवारी १६३ नवे बाधित रुग्ण आढळून आले असून २२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्र्या घटून १८८८ वर पोहोचली आहे. पाच बाधितांचा मृत्यू झाला असून यात ८७ वर्षीय पुरूष, ३७, ५०, ५२, ५२, ६० वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. यासह रावेर ४, चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ प्रत्येकी ३, जळगाव, बोदवड प्रत्येकी २, जामनेर १ बाधिताचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी ६३८२ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या यात ७४० बाधित आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरचे १७४१ अहवाल आले त्यापैकी २७२ बाधित आढळून आले आहेत. तर १५६४ आरटपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. ७९८ अहवाल प्रलंबित आहेत. अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची संख्या वाढून ८७० वर पोहोचली आहे.
रिकव्हरी रेट ८९ टक्के
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८९ टक्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक असे चित्र असल्याने रिकव्हरी रेट वाढला आहे.