मुक्ताईनगरात १० हजारावर रुग्णांचे गृह विलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:23 PM2020-08-16T21:23:30+5:302020-08-16T21:25:07+5:30
पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर १ जूनपासून आतापर्यंत १० हजार ५४० जणांंचे गृह विलगीकरण म्हणजेच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर : तालुक्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर १ जूनपासून आतापर्यंत १० हजार ५४० जणांंचे गृह विलगीकरण म्हणजेच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, होम क्वारंटाईन केलेल्यांनी घरीच थांबावे, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. मात्र काही महाभाग घरी न थांबता, थेट रस्त्यावर फिरताना दिसतात. हातावर होम ‘क्वारंटाईन’चा शिक्का पाहिल्यावर पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांना समज देत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १ जून रोजी आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत जवळपास ५२७ रुग्ण हे पॉझिटिव्ह असून, त्यापैकी ३८३ रुग्ण उपचार घेऊन ते घरी परतले आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीत कोरोनाचे ११७ रुग्ण असून, ते मुक्ताईनगर येथील विविध सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, तर १० रुग्ण मयत झाले आहेत.
तालुक्यात आरोग्य विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. असे असतानाही आतापर्यंत ५२७ पॉझिटिव्ह रुग्णांच्या हाय आणि लो रिस्कमध्ये येणाºया जवळपास १० हजार ५४० जणांना घरी विलगीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एका रुग्णामागे २० जणांची तपासणी करून त्यावर उपचार करणे व लक्षणे जाणवत असलेल्यांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात हलवणे यासारख्या प्रक्रिया वेगाने केल्या जात आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे गुणोत्तर प्रमाण हे अव्वल असल्याचे श्रेय उपजिल्हा रुग्णालय व तालुका वैद्यकीय कार्यालय या दोघांना जाते.
आजच्या तारखेला हाय रिस्कमधील २४ रुग्णांची मुक्तता करण्यात आली आहे. आठ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांनी दिली.
दरम्यान, ज्यांना होम क्वारंटाईन अर्थातच घरी विलगीकरण केले आहे त्यांच्याकडून मात्र नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. होम क्वारंटाईन शिक्के असलेले अनेकजण बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात तर असे प्रकार जास्त आढळून येत असले तरी मुक्ताईनगर शहरातदेखील अनेक जण होम क्वारंटाईन असूनही रस्त्यावर फिरताना आढळून येत असल्याचे चित्र आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागातदेखील कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. डोलारखेडा आणि अंतुर्ली या दोन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार उपाययोजनादेखील स्थानिक पातळीवर आणि वैद्यकीय पातळीवर करण्यात येत आहेत.