घराचे दुकान करून, मांडला लग्नाचा बस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:27+5:302021-05-19T04:16:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराम पेठ भागातील एका घरातच कपड्यांचे दुकान थाटून त्याठिकाणी लग्नाचा बस्ता खरेदी करण्याचा कार्यक्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बळीराम पेठ भागातील एका घरातच कपड्यांचे दुकान थाटून त्याठिकाणी लग्नाचा बस्ता खरेदी करण्याचा कार्यक्रम मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने उधळून लावला आहे. तसेच संबंधित घरमालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. या भागातील ८ दुकानेदेखील सील करण्यात आली आहेत.
३१ मे पर्यंत शहरातील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. मंगळवारी बळीराम पेठ भागातील एका कपड्याच्या दुकानावर असलेल्या घरात, दुकानातून आणलेला माल त्या घरात ग्राहकांना बोलावून कपड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने या घरात अचानक धाड टाकली. यावेळी घरात चक्क लग्नाचा बस्ता खरेदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे आढळून आले. याठिकाणी एकाच वेळी या घरात २० हून अधिक ग्राहक देखील आढळून आले. मनपाच्या पथकाने अचानक धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ग्राहकांनी बस्ता सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांनी मुख्य द्वार बंद करून सर्व ग्राहकांना देखील प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासह मनपाच्या पथकाने संबंधित घर मालक व दुकानदाराला देखील प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून दुकान देखील सील केले आहे.
हरिविठ्ठल नगरचा बाजारही उठवला ; विक्रेत्यांवर कारवाई
मंगळवारी शहरातील हरिविठ्ठल नगर भागात सायंकाळी भाजीपाला बाजार भरला जातो. मात्र सायंकाळी मनपाकडून कारवाई होत असल्याने मंगळवारी हा बाजार सकाळी भरविण्यात आला होता. तसेच या ठिकाणी १०० हून अधिक विक्रेत्यांनी आपले दुकाने थाटली होती. याबाबत या भागातील नागरिकांनी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे तक्रार केल्यानंतर, सकाळी १० वाजता मनपाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. मनपा पथक आल्यानंतर या बाजारात एकच गोंधळ उडाला. विक्रेत्यांनी आपला माल जमा करून या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला, यामध्ये काही विक्रेत्यांचा माल मनपाच्या पथकाने जप्त केला आहे. माल जप्त केल्याने काही विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी वाद देखील झाला. मात्र रामानंद नगर पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन हा बाजार पूर्णपणे उठवला. या ठिकाणी ३० हून अधिक विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला आहे.
८ दुकाने सील, बळीराम पेठेत पुन्हा गर्दी
सोमवारी शहरातील बळीराम पेठ भागात मनपा व पोलीस प्रशासनाने आपली पथके तैनात केले त्यामुळे गर्दीवर काही अंशी नियंत्रण आणले होते. मात्र मंगळवारी बळीराम पेठ भागात पुन्हा काही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मनपा कर्मचार्यांनी या ठिकाणी जाऊन ही दुकाने हटविण्याच्या सूचना दिल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद केला. मात्र बळीराम पेठ भागात काही दुकानदारांनी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर मनपाकडून या भागातील ८ दुकाने सील केली आहेत. तसेच प्रत्येक दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठवले आहे.