चाळीसगावला यंदा गवळी बांधवांचे घरगुती सगर पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:02 PM2020-11-16T12:02:10+5:302020-11-16T12:06:15+5:30
कोरोनामुळे रेड्याची झुंज यंदा रद्द करण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव पंचक्रोशीत गवळी बांधवांचा दिवाळी पर्वणीवर साजरा होणा-या सगर पूजन उत्सवाला मोठी परंपरा आहे. यावर्षी कोरोनामुळे ही परंपरा प्रथमच खंडीत झाली. रेड्यांच्या झुंजी झाल्या नसल्या तरी, रेड्यांचे घरगुती पूजन मात्र झाले. दरवर्षी दिवाळीला पाडव्याच्या दिवशी सगर पूजन होऊन रेड्यांच्या झुंजी रंगतात.
चाळीसगाव पंचक्रोशीत शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. चा-याची मुबलकता असल्याने येथे गवळी बांधवांची मोठी वस्ती आहे. त्यांच्याकडून गायी - म्हशींचे पालन करुन दूध विक्रीचा व्यवसाय केला जातो. पशुपालन करणा-या गवळी समाजही येथे मोठ्या संख्येने आहे.
रेड्यांना वर्षभर खास खुराक खाऊ घालून सगर लढतीसाठी तयार केले जाते. याबरोबरच त्यांच्या अंगावर रंगरंगोटी करुन काही प्रमाणात लढतीचे प्रशिक्षणही देतात. पाडव्याच्या दिवशी तयार रेड्यांना लढतीसाठी उतरविले जाते. यासाठी जिंकणा-या रेड्यांच्या मालकांना बक्षिसेही दिली जातात.
तितूर नदीपात्रात उडतो थरार
दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी गवळी बांधवांमध्ये मोठा उत्साह असतो. यादिवशी रेड्याची अंघोळ करुन त्याच्या अंगावर आकर्षक रंगकाम करण्यात येते. दुपारी लढतीत उतरणा-या रेड्यांची गोठ्यापासून वाजत - गाजत मिरवणूक काढली जाते. सायंकाळी हिरापूर रोडलगतच्या तितूर नदीपात्रात रेड्यांच्या लढतींची धुमश्चक्री उडते. पूर्ण ताकदीनिशी हे रेडे एकमेकांना भिडतात. हा थरार पाहण्यासाठी शौकिनांसह नागरिकांची मोठी गर्दी होते असते. यावर्षी कोरोनामुळे पोलिसांनी रेड्यांच्या झुंजीला परवानगी दिली नाही. त्यामुळे रेड्यांचे घरगुती पूजन केले गेले.
सगर पूजन हा आमचा मोठा उत्सव असतो. वर्षभर गवळी बांधव याची वाट पाहत असतात. रेड्यांना लढतीसाठी तयार केले जाते. यावर्षी कोरोनामुळे हे सर्व थांबले. मात्र रेड्यांची सजावट व घरगुती पूजन आवर्जून करण्यात आले. रेड्यांची झुंजी झाल्या नाहीत.
- पप्पू पहिलवान गवळी
भडगाव रोड, गवळीवाडा, चाळीसगाव.