घराची आस... सायकलवर १४०० किमी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 12:37 PM2020-05-09T12:37:47+5:302020-05-09T12:38:09+5:30
कोरोना इफेक्ट : कल्याण ते अलाहाबाद गाठण्यासाठी रोज ७० ते ८० किमी प्रवास, सायकलवर निघाल्यानंतर वाहने सुरू
आनंद सुरवाडे ।
जळगाव : लॉकडाऊनचा मजुरांच्या जीवनावर मोठा विपरित परिणाम झाला आहे़ घरासाठी काहींना हजारो किमीची पायपीट करावी लागते तर घराच्या ओढीने तहान- भूक विसरून या मंडळींनी सायकलीने जीवघेणा प्रवास सुरु केला आहे. याचाच प्रत्यय शुक्रवारी महामार्गावर आला़ कल्याण येथील २९ मजूर अलाहाबाद येथे जाण्यासाठी चक्क सायकलवर निघाले आहेत. तब्बल १४०० किमीचे हे अंतर कापण्याचा निर्धार केला आहे.
शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हे मजूर मानराजपार्क जवळ एका सावलीत विश्रांतीसाठी बसले होते़ यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याश्ी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊन व त्यानंतर त्यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामाचे भयानक वास्तव समोर आले़ यातील बरेच तरूण, प्रौढ हे कल्याण व उल्हासनगर येथे वास्तव्यास आहेत. कोणी शिलाईचे काम करीत होते़ कोणी पाईपाच्या कंपनीत होते़ काहींचे छोटे दुकान होते़ सायकलवरच आपले साहित्य बांधून काहींजवळ पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांनी घराचा मार्ग धरला आहे़
- आम्ही सायकलवरून निघून आलो तेव्हा ट्रक सुरू झाल्या़ त्यामुळे आम्हाला सायकलशिवाय पर्याय नव्हता़ बरेच लोक ट्रकमधून घरी परतत आहे़ ज्यांचे उद्योगावर पोट आहे ते केवळ परततील अन्य बरेच लोक परत इकडे येणार नाहीत, असेही काही मजुरांनी सांगितले़
काहींच्या जुन्या काहींच्या नव्या सायकली
घरी जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने आपल्याजवळ असलेल्या जुन्या सायकली काहींनी काढल्या व थेट ५ मे पासून कल्याणहून अलाहाबादचा मार्ग धरला़ पाच मे पासून निघाल्यानंतर ८ मेच्या दुपारी हे मजूर भर उन्हातही प्रवास करीत होते़ त्यानंतर काही वेळ ते जळगावात थांबले़ अजून आठ दिवस प्रवास करून १४०० किमीचे अंतर पार करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ रोज किमान ७० ते ८० किमीचा प्रवास ते करीत आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी भोजन व पाण्याची व्यवस्था होत असल्याचेही त्यांनी सांगितले़ निघण्यापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांनी आरोग्य तपासणी करुन घेतली आहे.