घरमालक दाम्पत्याला हिसका देवून चोरटे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:00 PM2019-07-19T12:00:42+5:302019-07-19T12:03:02+5:30
चार ठिकाणी घरफोड्या : श्रीकृष्ण कॉलनीत भरदिवसाची घटना ; चारचाकीने आले चोरटे; एका ठिकाणी ‘सीसीटीव्ही’त चोरटे कैद
जळगाव : घरातील ऐवज लुटून नेत असतानाच दरवाजातच घरमालक दाखल झाल्याने तारांबळ उडालेल्या चोरट्यांनी वृध्द दाम्पत्याला हिसका देवून पोबारा केल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे चार वाजता बजरंग बोगद्याला लागूनच असलेल्या श्रीकृष्ण कॉलनीत घडली. अलिशान कारमधून चार चोरटे आले होते. एक कारमध्ये तर तिघे इमारतीत चोरी करीत होते. गौरी एव्हेन्यू या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाºया प्रेमचंद जगतराव लालवाणी (६५) यांच्या घरात ही घटना घडली. ९० हजाराची रोकड व सहा तोळे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत.तर शेजारील वकीलांकडेही घरफोडी झाली. दरम्यान, गुरुवारी बळीराम पेठ, आयोध्या नगर येथेही घरफोड्या झाल्या.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गौरी एव्हेन्यू या अपार्टमेंटमध्ये प्रेमचंद लालवाणी, पत्नी गीता, मुलगी चारुशिला व प्रियंका अशासह वास्तव्याला आहेत. चारुशिला बॅँक आॅफ महाराष्टÑ मध्ये नोकरीला आहे तर प्रियंका सी.ए.आहे. दोन्ही जण ड्युटीवर होते. प्रेमचंद यांच्यावर उपचार सुरु असल्याने दवखान्यात जाण्यासाठी प्रियंका हिने दुपारी ड्युटीला जाण्याआधी आई व वडीलांना १२.४५ वाजता रिक्षात बसविले. रिंगरोडवरील डॉ.महेश बिर्ला यांच्याकडील उपचार झाल्यानंतर लालवाणी दाम्पत्य ३.४५ वाजता घरी आले असता लीफ्टच्या बाहेरच घरातून तीन जण येताना दिसले. तिघांनी पाठीमागे बॅग लावलेली होती. चोर असल्याचा संशय आल्याने गीता लालवाणी यांनी चोर...चोर...अशी आरडाओरड केली, मात्र बाहेर कोणाला आवाज पोहचण्याआधीच तिघं जण खाली उतरले व कारमध्ये बसून बजरंग बोगद्याकडून महामार्गाकडे पसार झाले.
वॉचमनच्या मुलाने घाईत लिहिला कारचा क्रमांक
या इमारतीत निखील मुखेडकर हा वॉचमन आहे.चोर..चोर...असा आवाज आल्यानंतर मुखेडकर यांचा मुलगा रोहित याने पलायन करणाºया चोरट्यांच्या कारवर दगड मारला..मात्र उपयोग झाला नाही. त्याने कारचा ओझरता क्रमांक पाहिला. तो एम.एच.१९-७९६८ असा अपूर्ण क्रमांक त्याने लक्षात ठेवला. त्याचवेळी बाहेर मंदिराच्या परिसरात असलेल्या बाबाराव शेळके यांनीही चोरट्यांनी कारमध्ये बसताना पाहिले, मात्र कार पुढे गेल्यावर ते चोरटे असल्याचे लक्षात आले.
९५०० हजार सुरक्षित
चोरट्यांनी एकाचवेळी लालवाणी व त्यांच्या शेजारी असलेले अॅड.ललीत सुभाष पाटील यांच्याकडेही चोरी केली. दोन्ही फ्लॅटच्या दरवाजांचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. जाताना दोन्ही घरांचे कुलुप त्यांनी सोबत नेले. अॅड. पाटील यांच्या एका बेडरुमध्ये कपाट फोडलेले असून दोन हजार रुपये लांबविले आहे, तर दुसºया खोलीत एका पाऊचमध्ये ठेवलेले साडे नऊ हजार रुपये सुरक्षित राहिले आहेत. अॅड. पाटील हे पत्नी देवयानी व मुलगी गोजेरी अशांसह मेहुण, ता.मुक्ताईनगर या मुळगावी बुधवारी दुपारी गेले होते. याच इमारतीत राहणारे नातेवाईक विजय महाजन यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.
लालवाणी यांच्याघरातून ९० हजाराची रोकड व दागिने लांबविले
लालवाणी यांच्या घरात ९० हजार रुपयांची रोकड व सहा तोळे दागिने होते. मोठ्या कष्टाने ही रक्कम व दागिने जमा केले होते, असे सांगत असताना गीता लालवाणी यांना रडू कोसळले होते. मुलगी चारुशिला व प्रियंका त्यांना धीर देत होत्या. तीन महिन्यापूर्वीच हे कुटुंब या इमारतीत राहायला आले होते. बेडरुमधील दोन्ही कपाटे फोडली असून चांदीचे भांडे लांबविले आहेत तर चिल्लरला चोरट्यांनी हातही लावलेला नाही. या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
दीड लाख लांबविले
सुुभाष तुलशिराम कुकरेजा (४६,रा.वैष्णवी अपार्टमेंट, गणेश नगर) यांच्या मालकीचे बळीराम पेठेत ‘ओम स्पोर्टस एन.एक्स’ नावाचे क्रीडा क्रीडा साहित्य विक्रीचे दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करुन न ते घरी गेले. गुरुवारी सकाळी आठ वाजता शेजारील चहा विक्रेता हातगाडीवर आला असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलुप तुटलेले दिसले. त्याने कुकरेजा यांना घटना कळविली.
कुकरेजा व मुलगा मयुर या दोघांनी दुकानावर येवून पाहणी केली असता कुलुप गहाळ झाल्याचे दिसले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त होते तर ड्राव्हरमध्ये ठेवलेली दीड लाखाची रोकड गायब झाल्याचे दिसले. दुकानातून चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर कुकरेजा यांनी आज शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली.
बॅँकेकडून आले दोन संशयित
कुकरेजा यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता २ वाजून ८ मिनिटांनी एक जण दुकानात तर दुसरा एक जण बाहेर दुचाकी दिसून येत आहे. शेजारील बॅँकेच्या सीसीटीव्ही कॅमेºयातही संशयित दिसून येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक निकम यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तपास उपनिरीक्षक जगदीश मोरे हे करीत आहेत.
आयोध्या नगरात दीड लाखाची घरफोडी
आयोध्या नगरातील यमुना नगरात दीपक लक्ष्मण कोल्हे (मुळ रा. भादली) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी दीड लाखाचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक कोल्हे हे पत्नी वर्षा यांच्यासह आयोध्या नगरातील यमुना नगरात वास्तव्याला आहेत. भादली येथे शेती असल्याने काही दिवस गावाला तर काही दिवस शहरात राहतात. बुधवारी सायंकाळी ६ वाजता घराला कुलुप लावून भादली येथे गेले होते.
गॅस सिलिंडर घेण्यासाठी कोल्हे सकाळी १० वाजता आयोध्या नगरात आले असता दरवाजाचे कुलुप तुटून खाली पडलेले होते. घरात जावून पाहणी केली असता लॉकरची तोडफोड झाली होती. कपाटातील दागिने गायब झालेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.