उंबरखेड व धारागिर गावात 12 ठिकाणी घरफोडी
By admin | Published: June 20, 2017 04:03 PM2017-06-20T16:03:46+5:302017-06-20T16:03:46+5:30
चोरटय़ांनी घरफोडीत रोख रकमेसह साडेचार लाखांचा ऐवज केला लंपास
Next
ऑनलाईन लोकमत
उंबरखेड,ता.चाळीसगाव, दि.20- चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्री उंबरखेड गावातील सहा दुकाने व दोन घरांमध्ये घरफोडी करीत लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. तर एरंडोल तालुक्यातील धारागिर येथे चार घरांमध्ये घरफोडी करीत तीन लाख 10 हजार 390 रुपयांचा ऐवज लंपास केला.
उंबरखेड बाजारपेठेतील सर्वोदय दूध संकलन केंद्रात दुध उत्पादकांची पेमेंटची रक्कम सुमारे 42 हजार रुपये चोरटय़ांनी लांबविले. त्यानंतर सुमतीलाल कोठारी यांच्या मालकीच्या महावीर किराणा या दुकानातून 800 रुपयांची रोकड व किराणा माल असा 15 हजारांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरटय़ांनी दुस:या मजल्यावरील माहिरीन मोबाईलचे दुकान फोडून त्यातील 6 मोबाईल आणि रोकड पाच हजार तर दिव्या अॅग्रो या बियाणे व कीटक नाशक दुकानातून 25000 रुपये गायब केले. चोरटय़ांनी शेजारील एका सलूनच्या दुकानात कुलुपे तोडून आत घुसले मात्र या ठिकाणी पैसे मिळाले नाही. त्यानंतर चोरटय़ांनी योगेश वाणी यांच्या मोबाईल व ङोरोक्स दुकानातून 27 हजारांचा ऐवज लांबविला. त्यानंतर चोरटय़ांनी आपला मोर्चा रहिवासी भागाकडे वळविला. त्यात 5 नंबर गल्लीतील योगेश वसंतराव पाटील यांच्या बंद घरात प्रवेश केला. मात्र या ठिकाणी काही मिळाले नाही. त्यानंतर कविता गोसावी यांच्या घरातील 12 हजार रुपये चोरून नेले. बाजारपेठ व रहिवासी वस्तीतील घरफोडीचा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटय़ांनी एरंडोल तालुक्यातील धारागिर गावात सोमवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. चोरटय़ांनी जयदेव धोंडू पाटील, सुनील सुभाष पाटील, सुभाष दयाराम पाटील, संजय सुभाष पाटील यांच्या घरातून तब्बल तीन लाख 10 हजार 390 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.