लोणीला संतप्त महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:24 PM2019-05-02T21:24:25+5:302019-05-02T21:24:56+5:30
पाणी टंचाई : ग्रा. पं. कार्यालयाच्या ओट्यावर मांडला ठिय्या
बिडगाव, ता. चोपडा : एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गंभीर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. मात्र लोणी ता.चोपडा येथे पाणी उपलब्ध असतांनाही निव्वळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्यांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने बुधवारी संतप्त थेट हंडा मोर्चा काढत ग्राम पंचायतीच्या ओट्यावर हंड्यांसह ठिय्या मांडला होता.
लोणी हे अवघ्या सोळाशे लोकसंख्येचे गाव आहे. गावात सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी तब्बल चार ट्युबवेल्स आहेत.मात्र ग्रामपंचायतीच्या गचाळ कारभारामुळे एक ट्यूबवेल नादुरुस्त होऊन पडली आहे. एक जळाली आहे. तर केवळ दोन सुरू आहेत. बिघाड झालेल्या ट्यूृबवेल्स दुरूस्त करण्याची तसदी ग्रामपंचायत घेत नाही. दोन ट्यूबवेल्सच्या आहे त्या पाण्याचेही नियोजन नाही. त्यामुळे गावातील अनेक भागात गेल्या आठ- दहा दिवसापासुन पाणीच मिळत नाही. तर अनेक ठिकाणी मिळते ते पाणीही गढुळ व दुषित मिळत आहे. याबाबत ग्रामस्यांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करून उपयोग होत नसल्याने वैताग येऊन त्याचा उद्रेक झाला व संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ग्रामसेवक मणिषा महाजन व सरपंच सत्तार तडवी यांच्या समोरच ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या ओट्यावरच हंडे घेऊन धडक दिली.
यावेळी तडवी वाडा, मारूती चौक व प्लॉट भागात पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. तर आमच्याकडे होणारा पाणीपुरवठा अतिशय दुषित होत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, त्याबाबत अनेक वेळा सरपंच, ग्रामसेवकाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे कमलेश युवराज पाटील यांनी सांगीतले. अनेक ठिकाणी लिकेज असुन गटारीचे पाणी नळांमध्ये येत असल्याचे धक्कादायक वास्तवही ग्रामस्थांनी यावेळी मांडले.
येथे गेल्या काही वषार्पुर्वी तब्बल २७ लाख रुपए खर्च करून भारत निर्माण योजने अंतर्गत काम झाले आहे मात्र ही योजनाच अद्याप ग्रामपंचायतीने ताब्यात घेतली नसल्याने या योजनेत मोठे गौडबंगाल झाल्याचे समजते. तर लोणी या गावासाठी स्वतंत्र ग्रामसेविका असुनही त्या नियमीत नसून दुर्लक्षामुळे कृत्रीम पाणी टंचाई होत आहे तर दुषित पाण्याचीही गंभीर समस्या असतांनाही त्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. यावेळी अवंताबाई पाटील, शालुबाई पाटील, राधाबाई पाटील, रत्नाबाई कोळी, ईम्तीयाज तडवी, सुशिलाबाई सोनवणे, भुरीबाई तडवी, भारती धोबी, संजुबाई, सलमा तडवी, जयश्री पाटील, शिलाबाई सोनवणे, एकनाथ पाटील, कमलेश पाटील, श्रीराम कोळी, मनोज पाटील, दशरथ कोळी, अरूण पाटील, जुम्मा तडवी, अरूण पाटील, नारायण पाटील,यांच्यसह अनेक महिला व पुरूष उपस्थीत होते.