यावल येथे मातृवंदना कार्यक्रमात मातांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:34 AM2019-12-25T01:34:04+5:302019-12-25T01:35:35+5:30

समाजातील मातृशक्तीचे दर्शन व्हावे व मातृप्रेमाचा सन्मान व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Honor of mothers in maternity program at Yawal | यावल येथे मातृवंदना कार्यक्रमात मातांचा सन्मान

यावल येथे मातृवंदना कार्यक्रमात मातांचा सन्मान

Next
ठळक मुद्देविविध क्षेत्रात कार्यरत मातांचा गौरव२५वा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या स्वरुपात करणारमातृवंदना कार्यक्रमामुळे मन:शांती मिळते- आचार्य महामंडलेश्ववर जनार्दन हरीजी महाराज

यावल, जि.जळगाव : मातृत्वास पारखे झालेल्या कै.पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मातृवंदना कार्यक्रमामुळे मन:शांती मिळते, आनंद मिळतो, स्वत:ला प्रेरणा व उर्जा मिळते, असे प्रतिपादन फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य महामंडलेश्ववर जनार्दन हरीजी महाराज मंगळवारी येथील मधुर संस्कार केंद्राच्या वतीने व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मातृहृदयी साने गुरूजी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित मातांचा सन्मान सोहळा 'मातृवंदना' या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
येथील सरस्वती विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक पी. आर.पाटील यांच्या संकल्पनेतून पूज्य साने गुरुजींच्या जयंतीच्या औचित्याने गेली सोळा वर्षे झाले मातृवंदना कार्यक्रम येथे साजरा होत आहे. यावेळी समाजातील मातृशक्तीचे दर्शन व्हावे व मातृप्रेमाचा सन्मान व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथील श्री गजानन महाराज मंदिरात परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, माजी कुलगुरू डॉ. के. बी.पाटील व सेवानिवृत्त प्रा.कमल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
सुरुवातीस आचार्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज, माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील, प्रा. कमल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर प्रा.व.पु. होले यांनी प्रास्ताविक केले. माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील म्हणाले, की शिक्षण शाळा कॉलेजात जाऊन मिळू शकते, मात्र संस्कार हे केवळ आईकडूनच मिळतात. शिक्षणापेक्षा संस्कार मोठा आहे. शिकलेल्या सुशिक्षितांपेक्षा अशिक्षित अडाणी लोकच आईचा सांभाळ व्यवस्थित करतात, मात्र शिक्षित लोक वृध्दाश्रमाचा मार्ग धरतात ही आजच्या साक्षर दुनियेतील शोकांतिका आहे. प्रा.कमल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज यांनी मातृवंदना कार्यक्रमाचा २५वा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या स्वरुपात करू, अशी घोषणा त्यांनी केली. सत्कारमूर्ती रोहिणी पाटील, शाबेरा तडवी, जनाबाई झांबरे यांनीही सत्काराला उत्तर देणारे मनोगत व्यक्त केले.
यांचा झाला सन्मान : शशिकला वासुदेव बडे (पातर्डी, जि.अहमदनगर), केवल ग्यानसिंग पाटील (खडकेसीम, एरंडोल), अलका लक्ष्मण बेंडाळे (सावदा), इंदुमती मंगेश मालखेडे (खिरोदा), रोहिणी रूपचंद पाटील (पुणे), जनाबाई पंढरीनाथ झांबरे, (वराडसीम, भुसावळ), शाबेरा मेहमूद तडवी (सौखेडासिम, ह.मु.मुंबई), सुलोचना भीमराव देशमुख (पोळ, जि.नाशिक), आशाबाई सीताराम पारधी (चोपडा), कमलताई सुरेश चौधरी (मुंबई ) या मातांचा प्रातिनिधिक सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात प्रा.राजेंद्रसिंह राजपूत, मधुराणी पाटील, निर्मल चतुर यांनी सूत्रसंचालन केले, तर बी.एन. पाटील यांनी आभार मानले. सन्मान सोहळ्यासाठी मधुर संस्कार केंद्र परिवाराचे सहकार्य लाभले.

Web Title: Honor of mothers in maternity program at Yawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.