भुसावळात विशेष तिकीट निरीक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 04:25 PM2021-01-06T16:25:45+5:302021-01-06T16:26:50+5:30
भुसावळात विशेष तिकीट निरीक्षकांचा सन्मान करण्यात आला.
भुसावळ : मंडळ वाणिज्य कार्यालयात वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानार्थ रामकर प्रसाद राम, अनिल सोनी (खंडवा) आणि कमलेश बऱ्हाणपूर या तिकीट निरीक्षकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कर्तव्याप्रति निष्ठा आणि निस्वार्थपणे त्यांनी प्रवाशांचे गाडीत सुटून गेलेले सामान परत मिळवून दिले आणि त्यांनी प्रवाशाला नि:स्वार्थपणे मदत केली.
उप-मुख्य तिकीट निरीक्षक, रामकर प्रसाद राम, अनिल सोनी (खंडवा) स्टेशन येथे कार्यरत असलेले यांनी प्रसंगावधाने गाडीत सुटलेली प्रवाशाची बॅग परत केली.
२ रोजी दुपारी तीनच्या सुमारास गोवा एक्स्प्रेसने कार्य करून खंडवा येथे आले आणि दोन्ही कर्मचारी कार्यालयात पोहचले तेव्हा पवन एक्स्प्रेसदेखील प्लॅटफॉर्म एकवरून रवाना झाली. त्याच वेळेस अचानक एक प्रवासी त्याच्या पत्नीसह त्याच्याकडे आला. दोघेही घाबरलेल्या अवस्थेत होते. ते नुकतेच जबलपूरहून पवन एक्स्प्रेसने खंडवा येथे आले असल्याचे प्रवाशांनी सांगितले. एस -३ कोचमध्ये १८ आणि १९ चा बर्थ होता. गाडीमधून उतरल्यावर कळले की लॅपटॉप व आवश्यक कागदपत्रे असलेली बॅग ते बर्थ क्रमांक १९ वर राहून गेली आहे. याची माहिती मिळताच तिकीट निरीक्षक रामाकर प्रसाद राम यांनी विलंब न करता ताबडतोब पवन एक्सप्रेसच्या ऑन ड्यूटी टीटीईला शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी बऱ्हाणपूरला कार्यरत टीटीई कमलेश यांना संपूर्ण घटना सांगितली. या माहितीमुळे पवन एक्सप्रेस बऱ्हाणपूरला पोहोचताच कमलेश कोच क्रमांक एस-३ मधील बर्थ क्रमांक १९ ला पोहोचले आणि त्यांनी बॅग तिथे ठेवल्याचे पाहिले व ताब्यात घेतली. राम यांनी बऱ्हाणपूर टीटीईला खंडवाकडे येणार्या ताप्तीगंगा एक्स्प्रेसमधून बॅग्स खंडवा येथे आणण्यास सांगितले. त्यानंतर कमलेश यांनी ती बॅग ताप्ती गंगा एक्स्प्रेस ने बुरहानपुर येथून खंडवा येथे बॅग पोचविली. बॅग प्रवाशांना सुपुर्द केली. याची दखल घेत प्रशासनाकडून त्यांचा यथोचित्त सन्मान करण्यात आला. मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी.जा .) अनिल पाठक यावेळी उपस्थित होते.