सरपंच, उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:15+5:302021-02-17T04:21:15+5:30
ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान झाले व आता १५ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ...
ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान झाले व आता १५ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील २३ सरपंच-उपसरपंचांची निवड झाली. ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी मोठी चुरस असते. सदस्य झाले म्हणजे कोणता लाभ होईल यापेक्षा गावात मान म्हणून यासाठी मोठे प्रयत्न केले जातात. त्यात आता सरपंच निवड आरक्षणानुसार होत असल्याने कोणत्याही पॅनलला बहुमत असले व त्या प्रवर्गाचा सदस्य त्यांच्याकडे नसल्यास कमी सदस्य असलेल्या पॅनलचाही सरपंच म्हणून निवडला जातो. त्यामुळे सदस्यांना निवडून येणे हाच मोठा मान मानला जातो.
सदस्य म्हणून निवडून आले तरी त्यांना मानधन नसते. ग्रामपंचायतमध्ये सरपंच-उपसरपंच यांना गावाच्या लोकसंख्येनुसार मानधन दिले जाते. मात्र सदस्यांना मानधन काही नसते. त्यांना केवळ बैठक भत्ता दिला जातो. त्यामुळे आता नवनियुक्त काही सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांनाही मानधन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. अनेक जणांनी तर यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती- ४३
निवडून आलेले सदस्य- ४८३
सरपंच- २३
२) मानधन ३००० ते ५००० ( हा बॉक्स कोणीही बदलू नये)
लोकसंख्या निहाय ग्रामपंचायती सरपंच मानधन उपसरपंच मानधन
० ते २००० ३००० रू. १०००रू.
२००१ ते ८००० ४००० रू. १५०० रू.
८ हजारांहून जास्त लोकसंख्या ५००० रू. २०००रू.
निवडून आलेल्या सदस्यांना दोनशे ते तीनशे रुपये बैठक भत्ता आणि चहा पाणी एवढ्यावरच समाधान मानावे लागते.
सरपंच काय म्हणतात
सरपंच-उपसरपंचांप्रमाणे सदस्यांनाही मानधन मिळाले. हा विषय शासनस्तरावरील असल्याने यासंदर्भात विचार होणे गरजेचे आहे. सदस्यांना मानधन मिळावे, यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- प्रदीप पाटील, सरपंच, शिरसोली प्र.बो.
सदस्यदेखील ग्रामपंचायतसाठी वेळ देत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल देऊन त्यांनाही मानधन देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत सदस्यांना मानधन मिळावे, यासाठी आपण मागणी करणार आहोत.
- युवराज गायकवाड, सरपंच, वडली.
ग्रामपंचायत सदस्यांना गेल्या अनेक दिवसांपासून बैठक भत्ता दिला जातो. सरपंच-उपसरपंचांना ज्या पद्धतीने मानधन दिले जाते तसेच मानधन सदस्यांनाही मिळावे. हे मानधन मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करू.
- गोविंदा पवार, सरपंच, म्हसावद.