महसुल प्रशासनाचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 03:59 PM2023-04-21T15:59:27+5:302023-04-21T15:59:44+5:30
यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
- कुंदन पाटील
जळगाव : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र कुंवर व बचतगटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणाऱ्या एरंडोल पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाटपासाठी ‘पेन्शन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविला होता. या उपक्रमाला राज्य शासनाचा १० लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला.
तसेच बचतगटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिल्याबद्दल एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला होता. शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सोहळ्यात प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, संजय गांधी निराधार योजनेचे तहसलिदार जितेंद्र कुंवर व मुख्याधिकारी विकास नवाळे यांना गौरविण्यात आले.