ग्रामीण भागातील सक्षमीकरणाची महिलांना ‘उमेद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 01:19 AM2020-03-08T01:19:58+5:302020-03-08T01:21:17+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांवर भर देण्याची गरज व्यक्त केली जात असताना धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाची ‘उमेद’ मिळाली आहे़

'Hope' for women empowerment in rural areas | ग्रामीण भागातील सक्षमीकरणाची महिलांना ‘उमेद’

ग्रामीण भागातील सक्षमीकरणाची महिलांना ‘उमेद’

Next
ठळक मुद्देमहिला दिन विशेषपरस बागेतून पिकवताहेत स्वत:चा भाजीपालागोधडी, पापडाच्या पारंपरिकतेपासून लघुउद्योगांकडे यशस्वी झेप

सुनील बैसाणे
धुळे : जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांवर भर देण्याची गरज व्यक्त केली जात असताना धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाची ‘उमेद’ मिळाली आहे़ परस बागेच्या माध्यमातून त्या आता स्वत:चा भाजीपाला पिकवू लागल्या आहेत़ गोधडी, पापड, लोणचे या पारंपारिक उपजीविकेपासून सुरू झालेला विकासाचा प्रवास आता लघुउद्योगांच्या निर्णायक टप्प्यात आला आहे़ शासनाने सुरू केलेल्या स्वयंसाहाय्यता बचत गट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनी सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतली आहे़
स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात करण्यात आले. राज्यात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या नावाने हे अभियान राबविले जात असताना त्याचे ‘उमेद’ असे नामकरण करण्यात आले. ‘उमेद’ या शब्दातच योजनेचा सगळा सार सामावला आहे. ‘उमेद’ ही कार्यकर्तृत्वाला चालना देणारी, मनाला उभारी देणारी गोष्ट. ‘उमेद’ असेल तर माणूस पुन्हा उभं राहू शकतो. याच ‘उमेद’ने राज्यात लाखो स्त्रियांना स्वयंरोजगाराची वाट दाखवली. त्यांच्यातील कौशल्याला नवे पंख दिले.
उमेद अभियानाच्या अंतर्गत स्विकारलेल्या दशसूत्रीमुळे महिलांच्या बचत गटांची गुणवत्ता ना केवळ राखली जात आहे; परंतु ती वाढतही आहे़ धुळे जिल्ह्यात आज ८ हजार ५१६ महिला बचत गट आहेत़ तर ७० महिला उत्पादक गट कार्यरत आहेत़ सध्या क्षमता बांधणीचे काम सुरू असल्याने ही संख्या वाढणार आहे़ उमेदने जिल्ह्यातील ५५१ पैकी ३९९ ग्रामपंचायतींमध्ये काम सुरू केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींध्ये बचत गटांच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे़ आतापर्यंत १८६२ बचत गटांना उमेदने दोन कोटी ७१ लाख ७२ हजार रुपये इतके खेळते भांडवल उपलब्ध करून दिले आहे़ एक हजार गटांचे प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात असून निधी प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे सुमारे दीड कोटींचे खेळते भांडवल लवकरच वितरीत केले जाणार आहे़ या महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु किंवा खाद्यपदार्थांना धुळे जिल्ह्यात ‘स्वयंसिध्दा’ नावाचा ब्रँड शासनाने उपलब्ध करून दिला आहे़ राज्यात विविध ठिकाणी होणाºया प्रदर्शनांमध्ये या ब्रँडच्या नावाने पापड, कुरडई, लोणचे, हळद, मसाला या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे़ त्यातून मिळणाºया उत्पन्नातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे़ साक्री तालुक्यामध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणावर पिकत असल्याने लवकरच येथील महिलांसाठी तांदूळ मीलचा प्रकल्प उभारला जाणार आहे़ येथील महिलांना शेळीपालनाची शास्त्रीय पध्दत शिकवून प्रशिक्षित केले आहे़
पशुसखी म्हणून लसीकरणाचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगार मिळवून दिला आहे़ विशेष म्हणजे चप्पल, स्लीपर, अगरबत्ती अशा प्रकारचे लघु उद्योग करायला महिलांनी सुरूवात केली आहे़ अशाच प्रकारे स्वयंरोजगारातून स्वावलंबी झालेल्या पाडळदे येथील महिलांच्या गटाला मुंबईतील प्रदर्शनात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते़
घरच्या घरी भाजीपाला
‘उमेद’च्या माध्यमातून महिलांना बचत करण्याची सवय लागली असून त्यांच्यात स्वयंरोजगारासह बँकेचे व्यवहार करण्याची क्षमता विकसीत झाली आहे़ परस बागेच्या माध्यमातून महिलांनी आता स्वत:चा भाजीपाला स्वत:च पिकवायला सुरूवात केली असून कुटूंबांचा दरवर्षाचा भाजीपाल्यावरचा पाच ते सहा हजार रुपयांचा खर्च वाचविला आहे़ धुळे जिल्ह्यात सध्या ७१७ वैयक्तिक पोषण परस बागा विकसीत करण्यात आल्या आहेत़ तर सामूहिक पोषण परस बागांची संख्या १२५ च्या आसपास आहे़ यातून सेंद्रीय पध्दतीने पिकविलेला भाजीपाला महिलांसह त्यांचे बालक आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याचे पोषण करीत आहे़ उरलेला भाजीपाला बाजारात विक्रीतून उत्पन्न मिळणार आहे़
दूग्ध व्यवसायात भरारी
जिल्ह्यात बचत गटातील महिलांनी उद्योग व्यवसायात उंच भरारी घेतली आहे़ शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील महिला दूग्ध व्यवसायात यशस्वी ठरल्या आहेत़ शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे येथील उत्पादक गटातील महिला दररोज शंभर ते दिडशे लिटर दूध संकलित करून हजारो रुपये उत्पन्न मिळवून सक्षम झाल्या आहेत़ शिरपूर तालुक्याच्या बलकुवे गावातील महिला त्याहून पुढे गेल्या आहेत़ त्यांनी स्वत:चे प्रॉडक्ट विकसित केले आहे़ रोज सरासरी दोनशे लीटर दूध उत्पादन आणि सकलन करुन व्यवसायात झेप घेतली आहे़ या तालुक्यात खताच्या नाफेड प्रकल्पासाठी दोनशे ते अडीचशे महिलांनी प्रस्ताव दाखल केले आहेत़
विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाची धुरा सांभाळणाºया उमेदच्या अधिकारीदेखील महिलाच आहेत़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी ह्या जिल्हा अभियान संचालक आहेत़, तर जिल्हा अभियान व्यवस्थापक म्हणून त्रिवेणी भोंदे काम पाहत आहेत़
भोंदे यांनी सांगितले की, महिलांच्या क्षमता बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार करून त्यांना स्वयंरोजगाराच्या दुसºया टप्प्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ शिवाय महिला आणि मुलांच्या आरोग्याचीदेखील नियमित काळजी घेतली जात आहे़ प्रधानमंत्री जीवनज्योती आणि प्रधानमंत्री जीवन सुरक्षा या माध्यमातून महिलांना विम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे़ माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी दवाखान्यात प्रसूतीचा आग्रह धरला जात आहे़ धुळे जिल्ह्यातील महिलांचा प्रतिसाद आणि उत्साह मोठा आहे़
आतापर्यंत कुटुंब सांभाळणाºया महिलांमध्ये आता ग्रामपंचायतीपर्यंत जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत़ गावविकास कृती आराखड्यात महिला सहभागी होऊ लागल्या आहेत़ महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल आहे़ विकासाच्या दिशेने उंच भरारी घेण्यासाठी महिलांच्या पंखांमध्ये बळ निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न उमेदची यंत्रणा करीत आहे़

Web Title: 'Hope' for women empowerment in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.