चाळीसगाव तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात घोडा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:23 AM2017-11-22T01:23:59+5:302017-11-22T01:27:03+5:30
अलवाडी गावाजवळची घटना : वनविभागाकडून टेहळणी
ऑनलाईन लोकमत चाळीसगाव, जि.जळगाव, दि.21 : अलवाडी गावाजवळ माळरानावर मेंढय़ांच्या कळपाशेजारी बांधलेल्या घोडय़ावर मंगळवारी पहाटे बिबटय़ाने हल्ला केला. यात घोडा ठार झाला. दुपारी वनविभागाने या परिसरात ड्रोन कॅमे:याव्दारे बिबटय़ाचा शोध घेतला. मात्र नेहमीप्रमाणेच तो अदृश्य झाला. दरम्यान, भडगाव तालुक्यातील वाडे येथे बिबटय़ा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलवाडी गावाजवळ बाबूलाल धनगर यांचा मेंढय़ांचा कळप आहे. गावापासून हे अंतर अवघे अर्धा किलोमीटर आहे. मंगळवारी पहाटे एक वाजता बिबटय़ाने घोडय़ावर हल्ला करीत त्याच्या मानेचा चावा घेतला. हल्ला होताच घोडा दोर तोडून दोन किलोमीटर अंतरापयर्र्त पळाला. बिबटय़ाने पुन्हा त्याच्यावर झडप घालत त्याला ठार केले. यानंतर त्याने घोडय़ाच्या मानेचे आणि पोटाच्या भागाचे लचके तोडले. सकाळी बाबूलाल धनगर यांना आपला घोडा मृत स्थितीत आढळला. चाळीसगाव प्रादेशिक वनविभागाचे संजय मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर पंचनामा करण्यात आला. वनविभागाने दुपारपयर्ंत याच परिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान, बिबटय़ाने घोडय़ाला ठार केल्याने अलवाडी परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली. या भागातही पिंजरे लावून वनगस्त सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.