किसान ॲपचे वरातीमागून घोडे; वादळ, वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:04+5:302021-05-24T04:15:04+5:30
तंत्रज्ञानाचा कसा होणार लाभ : ॲप अपडेट राहण्याची शेतकऱ्यांकडून अपेक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी ...
तंत्रज्ञानाचा कसा होणार लाभ : ॲप अपडेट राहण्याची शेतकऱ्यांकडून अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या माध्यमातून शेती, हवामानाची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाही होतो. परंतु, काही दिवसांपासून देण्यात येणारे संदेश हे वेळ गेल्यानंतर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन- तीन दिवस उशिराने मिळत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात वादळी वारे व काही ठिकाणी पाऊस झाला. प्रत्यक्षात वादळी वारे व पाऊस झाल्यानंतर हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाइलवर आला. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा संदेश देण्यात आला. तो संदेशही शेतकऱ्यांना उशिरा मिळाला.
सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असतानाही वेळ गेल्यानंतर संदेश प्राप्त होत आहेत. जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. आगामी काळात तरी किसान ॲपवरून दिले जाणारे संदेश, सावधानतेचे इशारे हे किमान एक-दोन दिवस अगोदर मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
किसान ॲपवर काय मिळते माहिती?
- किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व माहिती मिळते.
- हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामान पाहून शेतकरी कामाचे नियोजन करीत असतात.
- पीकपाणी, पिकांवरील रोगराई याविषयीदेखील माहिती मिळत असल्याने त्यादृष्टीने पिकांचे रक्षण करण्यासाठी मदत होते.
- हवामान, रोगराई यासह आवश्यक सर्वच माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा बराच फायदा होतो.
अपडेट वेळेत मिळावे
- तंत्रज्ञानाचे युग असल्याने कोणतीही माहिती वेळेत उपलब्ध होणे अपेक्षित आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
- पूर्वी मोबाइल व इतर साधने नसल्याने माहितीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र आता तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन माहिती अपडेट होणे आवश्यक आहे.
- वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या साह्याने बाजारपेठदेखील उपलब्ध होते. त्यामुळे त्याचीही माहिती अपडेट असावी.
माहिती उशिरा मिळते
किसान ॲपच्या माध्यमातून मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा प्राप्त होत आहेत.
- श्रीरंग पाटील, शेतकरी
सध्या तंत्रज्ञानाचे युग असून, याचा उपयोग सर्व जण करतात. शेतकरीदेखील आता तंत्रज्ञानाचा वापर करीत असून, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या ॲपद्वारे वेळेत माहिती उपलब्ध व्हावी.
- संतोष महाजन, शेतकरी
आज घरबसल्या शेतातील मोटर चालू-बंद करू शकतो, एवढे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. असे असताना ॲपवर माहिती उशिरा येणे म्हणजे माहिती अपडेट केली जात नसावी. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- शिवाजी सपकाळे, शेतकरी
इतर माध्यमेदेखील उपलब्ध
किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली जाते. ही माहिती उशिरा येत असल्यास याव्यतिरिक्त इतरही माध्यम शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या ॲप्सचा उपयोग करून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज येऊ शकतो, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.