मालपूर येथे बागायती शेती सोडून गावाला पुरवतात स्वखर्चाने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:23 PM2018-04-30T16:23:55+5:302018-04-30T16:23:55+5:30
ग्रामस्थ व गुरांसाठी स्वखर्चाने केली पाईप लाईन
आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.३० : सततचा तीन वर्षांचा दुष्काळ, त्यात शेतीचे उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत स्वत:ची बागायती शेती सोडून गावातील गुरे आणि ग्रामस्थांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याचे दातृत्व माजी सरपंच तथा प्रा.गणेश पवार गेल्या दीड महिन्यापासून करीत आहेत.
अमळनेर तालुक्यात काही गावांना दीड वर्षापासून टँकर सुरू आहे. सध्या ४५ गावांना टँकर सुरू आहेत. पाण्याचे स्रोत कमी होत असल्याने जनतेचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तालुक्यातील धार मालपूर येथे गेल्या अडीच महिन्यांपासून टँकर सुरू आहे. मात्र तत्पूर्वी गेल्या सहा महिन्यांपासून गुरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गणेश पवार यांनी स्वत:च्या शेतातून पाईप लाईन करीत गावातील हाळात पाणी टाकले. त्यामुळे गुरांचे हाल थांबले आहेत. दीड महिन्यापासून टँकरचे पाणी अपूर्ण पडत होते. ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी गणेश पवार यांनी स्वखर्चाने पाईप लाईन टाकली. ग्रामपंचायतीच्या मोठ्या प्लॅस्टिकच्या टाकीत हे पाणी टाकून ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
२२ एकर शेतीतील उत्पन्नावर सोडले पाणी
ग्रामस्थांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी स्वत:च्या २२ एकर बागायती शेतीमधील उत्पन्न घेणे बंद केले आहे. गावासाठी उत्पन्न न घेता फक्त गुरांना चारा मिळेल इतकेच पाणी स्वत:च्या शेताला देऊन ते गावासाठी पाणी देत आहेत. २२ एकर शेतीमध्ये उत्पादन घेऊन त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न घेता आले असते. मात्र त्यांनी ते टाळले. त्यांच्या या दातृत्वामुळे मालपूर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.