हॉस्पिटलची वारी, रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्स फिरतेय दारोदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:13+5:302021-04-29T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरातील कोविड हॉस्पिटल्स पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरातील कोविड हॉस्पिटल्स पूर्ण
क्षमतेने भरलेले आहेत. एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून
घ्यायचा असेल तर त्याच्या नातेवाइकांना आधीच हॉस्पिटल्समध्ये चौकशी करून
यावे लागते. थेट रुग्णाला आणायचे म्हटले तर अनेक अडचणी येतात. तसेच
बऱ्याचदा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी दारात तास दीड तास वाट
बघावी लागत आहे.
शहरात सध्या काही प्रमुख हॉस्पिटलमध्ये रुग्णांनाही वेटिंग करावे लागत
आहे. १५ फेब्रुवारीपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
सर्वच हॉस्पिटल फुल्ल झाले आहेत. आता नवे रुग्ण दाखल करायचे म्हणजे आधी
दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्च मिळायची वाट बघावी लागत आहे. त्यामुळे
दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णांना एकतर रुग्णालयाच्या दारात उभ्या
असलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये वाट बघावी लागत आहे. किंवा शहरातील विविध
हॉस्पिटलच्या दारोदारी एक बेड मिळाण्यासाठी फिरावे लागत आहे.
दिवसभरात किती फिरावे लागते
तीन रुग्ण पण तासोन्तास वेटिंग
मंगळवारी दिवसभरात मी तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. त्यात
सर्वांना पहिल्यांदा नेलेल्या रुग्णालयातच प्रवेश मिळाला. मात्र एका
ठिकाणी तर रुग्णाला बराच वेळ वाट बघावी लागली. गेल्या काही दिवसांपासून
हा प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक देखील वैतागतात.
रुग्णाला त्रास होत असतो. मात्र कुणाकडेच पर्याय नाही. - हरीश अहिरराव,
ॲम्ब्युलन्स चालक-मालक
गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना ने-आण करणे जिकिरीचे झाले आहे.
बऱ्याचदा रुग्णांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावे
लागते. तेव्हा शिफ्टिंग करताना जास्त अडचण होते. तीन ते चार
हॉस्पिटलमध्ये फिरल्यावर रुग्णांना क्वचित बेड मिळतो. त्यामुळे रुग्ण
अधिकच वैतागतो. - सुशील जाधव, ॲम्ब्युलन्स चालक
काही दिवस रुग्णांना बेड मिळण्यासाठी फिराफिर करावी लागत होती. मात्र
सुदैवाने मंगळवारी तसे काही घडले नाही. मंगळवारी दिवसभरात तीन ते चार
रुग्णांना रुग्णालयात सोडले. काही वेळ वाट पाहिल्यानंतर तेथेच त्यांना
बेड उपलब्ध झाला. - समाधान राठोड