महात्मा फुले योजनेत समाविष्ट रुग्णालयेही घेताय रुग्णांकडून पैेसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:33+5:302021-05-11T04:17:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योेजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयातही कोविड रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योेजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयातही कोविड रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा ८ रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी नोटिसा बजावून तीन दिवसात खुलासा मागितला आहे. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
नोटिसीत म्हटल्याप्रमाणे कोविड १९ च्या संदर्भात शासनाकडून २० पॅकेजेस (वेगळ्या आजारांवर उपचारांचा समावेश) महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आपल्या रुग्णालयात देण्यात आले आहेत. आपल्या रुग्णालयात कोविड रुग्णांचे उपचार केले जात आहेत, परंतु ते योजनेत न करता खासगी स्तरावर होत असून यामुळे कराराचा भंग करत आहात, त्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल उपस्थित करून आगामी तीन दिवसा खुलासा सादर करावा, हा विषय अत्यंत गांभिर्याने घेण्यात आला असून पुढील आठवडाभरात सुधारणा न झाल्यास, कोविड रुग्णांना मोफत उपचार न मिळाल्यास आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिला आहे.
मोफत उपचार अपेक्षित
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील ३४ रुग्णांलयांचा समावेश आहे. या रुग्णालयात या योजनेतील आजारांवर मोफत उपचार होतात व त्याचे बिल नंतर विमा कंपनीकडून रुग्णालयांना प्राप्त होत असते. यात कोविड १९ चा समावेश असून या योजनेतील ज्या रुग्णालयांनी कोविड उपचारांची परवानगी घेतली आहे. त्यांच्यात कोविडवर मोफत उपचार होणे अपेक्षित आहेत, मात्र तसे न होता ८ रुग्णालये खासगी तत्त्वावर हे उपचार करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
या रुग्णालयांना नोटीस
पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल, चोपडा येथील नृसिंह हॉस्पिटल, चाळीसगाव येथील बापजी जीवनदीप हॉस्पिटल, चाळीसगाव येथील कृष्णा क्रिटिकल केअर, जामनरे येथील जीएम हॉस्पिटल, जळगाव येथील अश्विनी हॉस्पिटल, जळगाव येथील महाजन हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.