आता रुग्णालयांनी ‘रेमडेसिविर’ उपलब्ध करून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:40+5:302021-04-14T04:14:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग पाहता ज्याला गरज आहे अशा रुग्णांना वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे यासाठी रुग्णालयात ...

Hospitals should now make ‘remedicivir’ available | आता रुग्णालयांनी ‘रेमडेसिविर’ उपलब्ध करून द्यावे

आता रुग्णालयांनी ‘रेमडेसिविर’ उपलब्ध करून द्यावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग पाहता ज्याला गरज आहे अशा रुग्णांना वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे यासाठी रुग्णालयात डॉक्टरांनीच हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे व त्याची रक्कम बिलात लावावी, अशा सूचना केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या सोबतच ऑक्सिजनचा काटकसरीने वापर तसेच जिल्ह्यातील ऑक्सिजनची स्थिती पाहता बिगर वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सध्या रेमडेसिविर व ऑक्जिजनचा पुरवठा हे दोन महत्त्वाचे मुद्दे दररोज प्रकर्षाने जाणवत आहे. त्या विषयी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या असून नियंत्रण कक्षाचीही स्थापना केली आहे.

सध्या ऑक्सिजन मुबलक, मात्र काटकसर आवश्यक

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी त्याच्या उपलब्धतेवर भर दिला जात आहे. सध्या जिल्ह्यात ५० टन ऑक्सिजन भरुन ठेवू शकतो, एवढी क्षमता असून सध्या ४० ते ५० टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. हा साठा सध्याच्या गरजेएवढा आहे. मात्र भविष्यात त्याचा तुटवडा भासू नये, यासाठी आतापासून त्याची काटकसर करणे गरजेचे आहे. अनेक वेळा रुग्ण नसला तरी ऑक्सिजन सुरू राहतो, पाईप गळती असते अशा वेगवेगळ्या कारणांनी ऑक्सिजन वाया जात असतो. हे टाळण्यासाठी त्यावर लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ वैद्यकीय वापरासाठीच ऑक्सिजनचा वापर

गंभीर रुग्णांची संख्या पाहता त्यांना ऑक्सिजनची गरज वाढत असताना आता ऑक्सिजनचा केवळ त्यासाठीच वापर केला जाणार असून बिगर वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला असल्याचे त्यांनी सांगितले.

खाजगी रुग्णालयात रेमडेसिविरचा अधिक वापर

१) रेमडेसिविर हे इंजेक्शन गंभीर स्थितीत रुग्णाला देण्याविषयी परवानगी दिली असून गंभीर रुग्ण लवकर बरा व्हावा, हा त्यामागचा उद्देश असतो. वापरासाठी आयसीएमआरने प्रोटोकॉलही ठरवून दिला आहे. मात्र असे असतानाही ज्या रुग्णांना आवश्यकता नाही त्यांनाही रेमडेसिविर दिले जात असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. स्कोअर नऊ पेक्षा अधिक असल्यास त्याच रुग्णाला रेमडेसिविर दिले जावे, कोणत्या रुग्णाला देऊ नये, किती द्यावे, याची नियमावली आहे.

२) शासकीय रुग्णालयांकडून ज्या प्रमाणात वापर झाला पाहिजे तेथे तो बरोबर होत आहे. मात्र खाजगी रुग्णालयात त्याचा अधिक वापर होत असून त्या ठिकाणी त्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आता ज्यांना आ‌वश्यकता आहे, वैद्यकीय दृष्ट्या तर्कसंगत आहे त्यांनाच रेमडेसिविर देण्याविषयी सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

३) जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या पाहता पुरवठा होणाऱ्या ५०० ते ६०० रेमडेसिविर इंजेक्शन पुरेसे आहे, मात्र खाजगी रु ग्णालयात १०० टक्के रुग्णांसाठी रेमडेसिविर वापरले गेले तर ते पुरेसे ठरणार नाही व त्यामुळेच त्याचा तुटवडा भासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Hospitals should now make ‘remedicivir’ available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.