उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहांना आता "मातोश्री" नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:00+5:302021-03-19T04:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर सध्या अस्तित्वात असलेली व पुढे बांधण्यात येणारी सर्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर सध्या अस्तित्वात असलेली व पुढे बांधण्यात येणारी सर्व शासकीय वसतिगृहे मातोश्री नावाने आता ओळखली जातील. वसतिगृहांच्या नामकरणाचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून तसे पत्र मंगळवारी काढण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली उच्च शिक्षण संचालनालयात, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय,अकृषी विद्यापीठ विद्यापीठ यांच्या अखत्यारीत शिक्षण घेणा-या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीसाठी वसतिगृहे आहेत. शासकीय वसतिगृहे ही केवळ भितींचा निवारा न राहता, वस्तीगृहे ही मुला - मुलींसाठी आधार, आपुलकी व स्नेहभाव निर्माण करणारी असावीत,. शिक्षण सहज व आनंददायी व्हावे तसेच पालकांच्या मनात मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात ठेवण्याविषयी विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने मातोश्री वसतिगृह हे असे समजणे संयुक्तिक ठरेल असे विभागाचे मत आहे.
तातडीने कार्यवाही करावी
दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेली व कोणत्याही विशिष्ट नावाने संबोधण्यात न येणाऱ्या मुला-मुलींच्या वसतिगृहांना तसेच यापुढे बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांना मातोश्री शासकीय वस्तीगृह असे नाव देण्यात येणार आहे. तसा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबत मंगळवारी विभागाने शासन आदेश काढला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय तसेच अकृषी विद्यापीठांनी तातडीने कार्यवाही करण्याची सूचनाही दिल्या आहेत.