हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:09+5:302021-04-06T04:15:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलांचा रोजगार थांबला आहे. इतकेच काय या महिलांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचाही पोटाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लॉकडाऊन किंवा उद्योग धंदे बंद करणे हा पर्याय सरकारने अवलंबू नये असे मत हॉटेलमध्ये पोळी, भाजी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले. जळगाव शहरात ७० बियरबार तर ६० रेस्टॉरंट हॉटेल आहेत जवळपास १३० हॉटेलमध्ये प्रत्येकी दोन महिला चपाती,भाकरी तर एक महिला भांडी घासण्याचे काम करते. आता या सर्वच महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील या महिलांचा आकडा ४९० च्या घरात आहे. एका महिलेवर किमान तीन जण अवलंबून आहेत. जवळपास दीड हजाराच्यावर लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये सर्व पदार्थ बनविण्यासाठी कूक असले तरी पोळी किंवा भाकरी करण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये काही महिला येत असतात. काही शहरांत घरातूनच पोळी-भाकरी करून हॉटेल्सना पुरविले जाते. आता आजपासून हे देखील थांबणार आहे.
-शहरातील हॉटेल्सची संख्या -१३०
-या हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची संख्या -४९०
२) हॉटेलमध्ये पोळी-भाकरी करून कुटुंब चालविणाऱ्या तीन महिलांची प्रतिक्रिया.
कोट...
मागील वर्षी परिस्थिती अत्यंत वाईट होती. हाॅटेल बंद, इतर उद्योग बंद त्यामुळे रोजगार बंद होता. दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड होते. सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे काही दिवसांची सोय झाली होती. सरकारने गरीबांच्या रोजीरोटीचा विचार करावा.
- लता अरुण भावसार, तुकारामवाडी
कोट...
कोरोनामुळे सर्वात जास्त हातावर पोट असलेल्या गरिबांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी आमचे खूप हाल झाले. आताही सरकारने हॉटेल बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देखील आमचा रोजगार जाणार आहे. कमवू तरच खाऊ, नाहीतर उपाशी राहू अशी आमच्या गरिबांची स्थिती आहे.
- कुसुम एकनाथ कोळी, रा.असोदा
कोट....
कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद ठेवला तरी इतर व्यवसाय किंवा उद्योगात आम्हाला कोणीही कामाला लावत नाही. परिणामी सर्वच ठिकाणी रोजीरोटी चालते गेल्यावर्षी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. दानशुर लोकांनी दिलेल्या धान्यामुळे मोठी मदत झाली. यंदा मदतीचेही हात थांबले आहेत.
-संगीता शांताराम काकडे, रा. तानाजी मालुसरे नगर
वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक !
गेल्या वर्षाप्रमाणे सरकारने आताही लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे आतादेखील गरिबांच्या पोटावर मारले जात आहे.गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती होती. तेव्हा चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. सामाजिक संघटना झोपडपट्टी भागात जेवण वाटप करायच्या त्या ठिकाणी अक्षरशः रांगेत थांबून जेवण मिळवावे लागले. अशी वेळ कधीच आली नव्हती, ते वर्ष कसे काढले ते आम्हालाच ठाऊक. सण, उत्सव तर नशिबात नव्हताच. व्याजानेही कुणी पैसे द्यायला तयार होत नव्हते, अशी परिस्थिती होती. सध्याचे चित्र पाहता यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांना वाटू लागली आहे. सरकारने गरिबांच्या पोटाचा विचार करून निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा या महिलांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.