महामार्गाचा आणखी एक बळी... कंटेनरच्या धडकेत हॉटेल कारागीर जागीच ठार, रात्री ११ वाजेनंतर वाहतूक दोन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:42 AM2020-02-06T01:42:22+5:302020-02-06T01:42:41+5:30
दोन तास मृतदेह जागेवरच पडून
जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाळू देविदास पाटील (३५, रा. देवपिंप्री, ता. जामनेर, ह.मु. मण्यारखेडा, ता. जळगाव) या हॉटेलवरील कारागिराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव-भुसावळ मार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
बाळू देविदास पाटील हा कालिंका माता चौकात लयभारी नावाच्या चायनीजच्या गाडीवर कारागिर होता. रात्री ११ वाजता काम आटोपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एफ.८८२०) घरी जात असताना दूरदर्शन टॉवरजवळ मागून येणाºया कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात बाळू पुढच्या चाकात चिरडला गेला. याच वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील जळगावहून नशिराबादला जात असताना अपघात पाहून थांबले. त्या वेळी लालचंद पाटील व पोलिसांमध्ये वाद झाला.
संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला होता. अखेर १२.४० वाजता आंदोलक महामार्गावरुन उठले. १२.४५ वाजता रुग्णवाहिकेत मृतदेह टाकून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी तीन कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.