जळगावात सुरू होणा-या हवाईसेवेमुळे हॉटेल उद्योगाला मिळणार ‘बुस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:56 PM2017-12-22T13:56:24+5:302017-12-22T13:59:22+5:30

हॉटेलचे वाढणार ‘रेटिंग’

Hotel industry will get 'booster' due to the airport launch in Jalgaon | जळगावात सुरू होणा-या हवाईसेवेमुळे हॉटेल उद्योगाला मिळणार ‘बुस्टर’

जळगावात सुरू होणा-या हवाईसेवेमुळे हॉटेल उद्योगाला मिळणार ‘बुस्टर’

Next
ठळक मुद्दे विदेशी पर्यटकांचा ओघ वाढल्यास आर्थिक उलाढालीला चालनातारांकीत हॉटेल साकारणार

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22-   विमानसेवेमुळे सुवर्णनगरीतील उद्योग, व्यापार, पर्यटन वाढीस चालना तर मिळणार असून या सोबतच पर्यटक, प्रवाशांच्या आगमनाने हॉटेल उद्योगास मोठी चालना मिळून हा उद्योग गगन भरारी घेऊ शकेल, असा विश्वास हॉटेल व्यावसायिकांमधून व्यक्त केला जात आहे. यामुळे येथील हॉटेलची गुणवत्ता (रेटिंग) वाढून तीन अथवा पंचतारांकीत हॉटेल जळगावात उभ्या राहण्यासही मदत होणार असल्याचा सूर उमटत आहे. 
पर्यटक, प्रवाशी यांची संख्या जेथे जास्त असते तेथे हॉटेल व्यवसायाला कायम सुगीचे दिवस असतात. तसेच विमानसेवा आहे तेथे येणा:या प्रवाशांची हॉटेलची मागणीही जास्त असते. त्यामुळे तेथे हा व्यवसाय भरभराटीस येतो. जळगावात मात्र विमानसेवेचा अभाव असल्याने येथील दज्रेदार हॉटेल असूनही पाहिजे त्या प्रमाणात पर्यटक, प्रवाशांचा ओघ या हॉटेल्सकडे आतार्पयत पाहिजे तसा नाही.

पर्यटक वाढीमुळे हॉटेल गजबजणार
जळगावात विमानसेवा सुरू झाल्याने जवळच असलेल्या अजिंठा लेणी, लोणार सरोवर येथे जाणारे पर्यटक जळगावातून गेले व परत आले तर त्यांची हॉटेलसाठी मागणी वाढेल. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक सध्या औरंगाबाद येथे विमानाने येऊन तेथून ते वाहनाने अजिंठालेणीला येतात. मात्र जळगावातून लेणीचे अंतर औरंगाबादपेक्षा निम्मे असल्याने पर्यटकांचा ओघ आता जळगावात वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथे येणा:या पर्यटकांना साहजिकच हॉटेलची गरज भासणार आहे. त्यामुळे येथील हॉटेल गजबजणार असल्याचा विश्वास हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. 

उद्योजक, व्यापा:यांचाही ओघ वाढणार
जळगावातील डाळ, प्लॅस्टीक उद्योग मोठे असल्याने तसेच येथील व्यापार क्षेत्रही मोठे असल्याने विमानसेवेमुळे  बाहेरचे उद्योजक, व्यापारी येथे येण्यास सुरुवात होणार असल्याने त्यांच्याही राहण्याची सोय होण्यासाठी हॉटेलकडे कल राहणार आहे. 

नवीन कंपन्या येणार
विमानसेवेमुळे हॉटेलची मागणी वाढणार असल्याने येथे ठिकठिकाणचे हॉटेल व्यावसायीक तसेच काही नामांकीत कंपन्या जळगावात हॉटेलसाठी पुढाकार घेतील, असेही सांगितले जात आहे. यामुळे जळगावात ‘हॉटेल इंडस्ट्री’ नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

आर्थिक उलाढालीस चालना
जळगावात हॉटेल उद्योग वाढल्यास तसेच विदेशी पर्यटकांच्या आगमनामुळे येथील आर्थिक उलाढालीसही चालना मिळेल. व्यापा:याच्या माध्यमातून होणा:या कोटय़वधींच्या उलाढालीत या माध्यमातून आणखी भर पडल्याने जळगावाचा विकासही होऊ शकले, असेही सांगितले जात आहे. 

तारांकीत हॉटेल साकारणार
जळगावातच नव्हे संपूर्ण खान्देशात जळगाव येथे एकमेव तीन तारांकीत (थ्री स्टार) हॉटेल होते, तेदेखील बंद पडले आहे. मात्र आता विमानसेवेमुळे येथील हॉटेल्सचे रेटींग वाढून ते कदाचित तीन तारांकीत (थ्री स्टार), पंचतारांकीत (फाईव्ह स्टार) होऊ शकतात, असे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. यामध्ये बाहेरचे हॉटेल व्यावसायिक तारांकीत हॉटेल येथे सुरू करू शकतात, असेही सांगितले जात आहे. 

विमान प्रवाशांची मागणी जपावी लागते
विमानाने प्रवास करणा:या प्रवाशांची हॉटेलबाबतची मागणी इतरांपेक्षा वेगळी असते. ते हॉटेलच्या स्टॅण्डर्डला मोठे महत्त्व देतात. त्यामुळे तो दर्जा संभाळणे गरजेचे ठरणार असून त्यानुसार हॉटेलच्या गुणवत्ता वाढीसही चालना मिळेल.

जळगाव येथून अजिंठा लेणी, लोणार हे पर्यटन स्थळ असल्याने तेथे जाणा:या पर्यटकांचा ओघ जळगावातून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांची हॉटेलची मागणी वाढून हा उद्योग भरभराटीस येईल. 
- लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव हॉटेल अॅण्ड टुरीझम डेव्हलपमेंट असोसिएशन

विमानसेवेमुळे जळगावात येणा:या पर्यटक, उद्योजक, व्यापारी यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांची मागणी वाढल्याने हॉटेल व्यवसाय वाढणार आहे. 
- संजय जगताप, सचिव,  जळगाव हॉटेल अॅण्ड टुरीझम डेव्हलपमेंट असोसिएशन

Web Title: Hotel industry will get 'booster' due to the airport launch in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.