हॉटेल वेटरची तापी नदीपात्रात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:08+5:302021-06-09T04:21:08+5:30
रावेर : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे मध्य प्रदेशातील नेपानगर येथून भटकंतीत आलेल्या गोपाळ चिंधू पाटील (वय ५०) या प्रौढास एका ...
रावेर : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे मध्य प्रदेशातील नेपानगर येथून भटकंतीत आलेल्या गोपाळ चिंधू पाटील (वय ५०) या प्रौढास एका हॉटेलमध्ये रोजगार मिळाला असता, निंभोरासीम येथे गावात जाऊन येण्याची सबब सांगून त्याने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली.
रावेर पोलीस सूत्रानुसार, कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे भरकटलेल्या गोपाळ चिंधू पाटील (वय ५०, रा नेपानगर, मध्य प्रदेश) या प्रौढाला निंभोरासीम लगतच्या हॉटेल सह्याद्रीवर भोजन पार्सल पुरविण्याचा रोजगार हॉटेल मालक राकेश घोरपडे यांनी दिला होता. दरम्यान, दुपारी गावात जाऊन येतो, अशी सबब सांगून गेलेला इसम परतला नाही म्हणून राकेश घोरपडे यांनी शोधाशोध केली. मात्र, पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या इसमाचा मृतदेह धुरखेडा शिवारातील तापी नदीपात्रात आढळून आला.
हॉटेलमालक राकेश घोरपडे यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय खंडेराव पुढील तपास करीत आहेत.