ग्राहकांची जत्रा भरविणाऱ्या हाॅटेलमालकाला ५० हजारांच्या दंडाची टीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:48+5:302021-05-29T04:13:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या कडक निर्बंध काळात हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सलची परवानगी असताना, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या कडक निर्बंध काळात हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सलची परवानगी असताना, हॉटेल सुरू ठेवत हॉटेलमध्ये ग्राहकांना प्रवेश दिल्यावरून शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील बॉम्बे हॉटेलवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. मनपा उपायुक्तांनी हे हॉटेल सील केले असून ५० हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
शुक्रवारी रेल्वेस्टेशन परिसरातील बॉम्बे हॉटेल सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास मनपा उपायुक्तांनी थेट हॉटेलवर जात पाहणी केली असता हॉटेलमध्ये पंधरा ते वीस ग्राहक आढळून आले. संबंधित हॉटेल चालकांना केवळ पार्सल साठी परवानगी दिली असताना, हॉटेलमध्ये गर्दी केल्याने मनपा उपायुक्तांनी हे हॉटेल सील करण्याच्या सूचना मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाला दिल्या. तसेच संबंधित हॉटेल मालकाला ५० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस देखील मनपा प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे.
कारवाई टाळण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून दबाव
या हॉटेलवर कारवाई टाळण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव देखील टाकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपा अधिकाऱ्यांना फोन करून कारवाईत टाळण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची ही चर्चा सुरू होती. मनपातील काही कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा देखील दिला आहे.
कपड्यांची सहा दुकाने सील
रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल सहा मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शुक्रवारी शहरातील सहा दुकाने देखील सील केली आहेत. विशेष म्हणजे काही दुकानांमध्ये एकाच वेळी २० ते २५ ग्राहक आढळून आले. महात्मा फुले मार्केट परिसरातील पोशाख, आदिनाथ एंटरप्राइजेस, टीप टॉप, नवी पेठ परिसरातील शिव कलेक्शन, नटवर मॉल परिसरातील सुशील वुमन शॉपी व सिल्वर लोरी ही दुकाने मनपाकडून सील करण्यात आली असून, सर्व दुकान मालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
मनपाच्या जागेवर लावण्यात आलेल्या हातगाड्या जप्त
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक व शिवाजी रोड परिसरात व्यवसाय करणाऱ्या अनाधिकृत हॉकर्स वर देखील कारवाई करण्यात आली आहे. यासह जुन्या साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर उभ्या करण्यात आलेल्या अनाधिकृत हॉकर्स च्या हात गाड्या देखील मनपा कडून तप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई करताना काही विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद देखील झाला होता.