घरातून ५ लाखांचा ऐवज लांबविला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:16 PM2019-01-03T17:16:41+5:302019-01-03T17:16:51+5:30
दादाराव सोनवणे हे मुळचे रावेर येथील रहिवाशी असून खते विक्रीचा त्यांचा व्यवसाय करतात.
जळगाव : वणी (नाशिक) येथील सप्तश्रृंग मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या दादाराव देविदास सोनवणे (३६) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून साडे चार लाख रुपये रोख व ५२ हजार ३०० रुपये किमतीचे दागिने असा पाच लाखांवर ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जळगावातील सदाशिव नगरात उघडकीस आली.
दादाराव सोनवणे हे मुळचे रावेर येथील रहिवाशी असून खते विक्रीचा त्यांचा व्यवसाय करतात. सदाशिव नगरात ते पत्नी, दोन मुल व सासूसह राहतात. संपूर्ण कुटुंब बुधवारी पहाटे पाच वाजता वणी येथे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लांबविली. गुरुवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.