जळगावात बंद घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:18 AM2019-02-20T11:18:46+5:302019-02-20T11:19:17+5:30
चार वर्षांपासून घर बंदच
जळगाव : शहरातील मोहन नगरातील किशोर पुरूषोत्तम सरोदे (ह.मु. पुणे) यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील साहित्याची फेकाफेक केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकाराची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी सकाळी धाव घेतली होती.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, मोहन नगरातील रहिवासी किशोर सरोदे हे पूर्वी जळगाव येथे एका बॅँकेत नोकरीस होते. त्यांची चार वर्षांपूर्वी पुणे येथे बदली झाल्याने ते कुटुंबासह पुणे येथे रहातात. त्यामुळे त्यांचे घर चार वर्षांपासून जवळपास बंदच आहे.
घर बंद असल्याचे पाहून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील कपाट, पेट्या डबे उघडून सामानाची फेकाफेक या चोरट्यांनी केली. प्रत्यक्षदर्शिंच्या सांगण्यानुसार घरभर कपडेच कपडे पसरलेले होते. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन तेथील सामानाचीही फेकाफेक केली. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
पोलिसांनी घेतली धाव
घरात झालेल्या चोरीच्या प्रयत्नाची माहिती कॉलनीतील नागरिकांनी रामानंद नगर पोलिसांना कळविली. तसेच पुणे येथील किशोर सरोदे यांनाही माहिती कळविली. सरोदे हे मंगळवारी सायंकाळपर्यंत जळगावी पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल होईल.