‘धुळी’मुळे २४ तास बंद ठेवावी लागत आहेत घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:54+5:302021-03-10T04:16:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील खराब रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या समस्येने जळगावकर अक्षरश: हैराण झाले आहेत. अनेक वर्षांपासून ...

Houses have to be closed for 24 hours due to 'dust' | ‘धुळी’मुळे २४ तास बंद ठेवावी लागत आहेत घरे

‘धुळी’मुळे २४ तास बंद ठेवावी लागत आहेत घरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील खराब रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या समस्येने जळगावकर अक्षरश: हैराण झाले आहेत. अनेक वर्षांपासून धुळीच्या समस्येने ग्रस्त असलेले जळगावकर आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. धुळीची समस्या आता इतकी भयंकर होत आहे की जळगावकरांना आता चोरांचा नव्हे तर धुळीच्या भीतीने २४ तास दरवाजे बंद ठेवावे लागत आहेत. उदासीन सत्ताधारी केवळ कोट्यवधींची स्वप्न जळगावकरांना दाखवण्याचे काम करत आहेत, तर दुसरीकडे जळगावकरांचे घर, गाड्या व दुकाने अक्षरश: धुळीने माखलेली दिसून येत आहेत.

वर्षभराच्या आत शहराचा चेहरामोहरा बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी जळगावचा चेहरा खरेच बदलवून दाखवला आहे. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ अशा दुहेरी समस्येला जळगावकर तोंड देत आहेत. मात्र अनेक वर्षांपासून सहनशीलतेने या समस्येला तोंड देत असलेला जळगावकरांचा संयम आता सुटत असून नागरिक मनपातील सत्ताधारी व प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत. नागरिकांचा आक्रोश आता दिवसेंदिवस वाढू लागला असून, गेल्या आठवडाभरात शहरातील विविध भागात नागरिक सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत.

हे रस्ते आहेत धुळीचे हॉटस्पॉट

शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असून, काही रस्ते धुळीसाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. शहरातील काही भागात जाऊन पाहणी केली यामध्ये इच्छादेवी चौक ते डीमार्टचा रस्ता, गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक, दूध फेडरेशन ते बजरंग बोगदा, काव्यरत्नावती चौक ते रामानंदनगर स्टॉप, गुजराल पेट्रोल पंप ते निमखेडी, स्टेडियम ते स्वातंत्र्य चौक या प्रमुख रस्त्यांसह दादावाडी, शिवाजीनगर, प्रेमनगर, अजिंठा चौक ते नेरी नाका, चंदू अण्णानगर, अयोध्यानगर या उपनगरांमध्येही जाऊन पाहणी केली. या सर्व रस्त्यांवर प्रचंड धूळ पाहायला मिळाली. या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे अनेक नागरिकांनी घरांवर ग्रीन नेट लावलेले दिसून आले.

वातावरणात धूलिकणांचे वाढले प्रमाण

गेल्या दोन वर्षात शहरातील हवेच्या अहवालात वातावरणात मोठ्या प्रमाणात धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रमाणात धूलिकणांचे प्रमाण कमी झाले असले तरी सरासरीपेक्षा हे प्रमाण अधिकच असून, धूलिकणांमुळे श्वसनाच्या विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. श्वसनाद्वारे शरीरात जाणारे धूलिकण आरएसपीएम (रिस्पेरेबल सस्पेडंट पर्टिकुलर मॅटर) व श्वसनाद्वारे शरीरात न जाणारे धूलिकण आरएसपी(सस्पेडंट पर्टिकुलर मॅटर), दोन्ही धूलिकणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला केवळ शहरातील नादुरुस्त रस्तेच जबाबदार असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. जळगावच्या हवेत सरासरी ६० टक्के धूलिकणांचे प्रमाण असते. मात्र, दोन वर्षात हे प्रमाण ७२ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या दोन वर्षात शहरातील धूलिकणांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे.

अर्धा दिवस जातो केवळ साफसफाईतच

१. चंदूअण्णा नगरातील रहिवासी ममता चौधरी यांनी सांगितले की, दिवसभरातून दरवाजा बंद ठेवला तरीही सात वेळा घराची साफसफाई करावी लागते. तसेच आमच्या भागात पाण्याची समस्या असतानाही रस्त्यावरून धूळ उडून घरात येऊ नये म्हणून रस्त्यावर दिवसातून तीन वेळा पाणी मारावे लागत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

२. एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील गृहिणी लीना दुबे यांनी सांगितले, घराय्या भोवती ग्रीन नेट टाकण्यात आली असतानाही घरात प्रचंड धूळ दिवसभरात निर्माण होते. अर्धा दिवस केवळ घराची साफसफाई करण्यातच जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोट..

अमृत अंतर्गत सुरू असलेल्या भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम संपल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी निधीदेखील मंजूर आहे. रस्त्यांची कामे झाली म्हणजे धुळीची समस्यादेखील कमी होईल. यासाठी लवकरात लवकर कामे करण्यावर भर दिला जाणार आहे.

- भारती सोनवणे, महापौर

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरीकडे नागरिक धुळीमुळे परेशान झाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून केवळ नवीन रस्त्यांची कागदावरच घोषणा केली जात आहे. दोन वर्षं जळगावकरांनी संयम पाळला. मात्र आता जळगावकरांचा संयम सुटत असून सत्ताधाऱ्यांनी शहरातील समस्यांबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

- नितीन लढ्ढा, नगरसेवक, शिवसेना

Web Title: Houses have to be closed for 24 hours due to 'dust'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.