चिमुरड्यांसह गृहिणी खूश्श...संस्थाचालक मात्र नाखूश; दुसरीपर्यंतच्या शाळा भरणार सकाळी ९ वाजता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 05:52 PM2023-12-19T17:52:06+5:302023-12-19T17:53:05+5:30
वर्गखोल्यांचा ताळमेळ घालण्यासाठी करावी लागणार कसरत
- कुंदन पाटील
जळगाव : बालवाडी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेपासून भरवण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर चिमुरड्या विद्यार्थ्यांसह गृहिणींनी आनंदल्या असून संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापन मात्र या निर्णयामुळे नाखूश असल्याचे दिसून आले आहे.
राज्यापाल रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना केली होती. त्यानुसार शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सोमवारी केली. या निर्णयानंतर दुसऱ्यादिवशी विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनात पडसाद उमटले.
शाळांची कोंडी
बहुतांशी शाळा दोन सत्रात भरविल्या जातात. पहिली ते ७ आणि आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या सत्रात भरविले जातात. वर्गखोल्यांची उपलब्धता पाहून काहींनी हा पर्याय निवडला आहे. आता दुसरीपर्यंतचे वर्ग़ सकाळी ९ वाजेपासून भरणार असल्याने शाळाखोल्यांची उपलब्ध करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.
मी काय म्हणते...
सकाळी पोरं उठत नाहीत. त्यातच त्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करताना कसरत होते. तशातच शाळेत न्यायला रिक्षा दारात धडकते.त्यामुळे अनेकदा कोंडी होते. मात्र आता सकाळी ९ वाजेची वेळ झाल्याने सर्वच अडचणी दूर होणार आहे.
-शुभांगी बारी, गृहिणी.
खरं आहे पण...
या निर्णयाला विरोध नाही.मात्र दोन सत्रात शाळा भरविणाऱ्यांची अडचण होणार आहे. नऊऐवजी आठ वाजेची वेळ केली असती तर योग्य राहिले असते. या वेळेत कायमस्वरुपीपेक्षा ऋतूमानानुसार बदल करायला हवा होता.
-मनोज पाटील, संस्थाचालक.
ऐका ना...
मुलांच्यादृष्टीने निर्णय योग्य आहे. शाळेत पुरेशी सोय नसते म्हणून त्यांचे सकाळचे विधी घरीच पूर्ण करावे लागतात. म्हणून साडेसात किंवा आठवाजेपासून शाळेची वेळ निश्चीत केली असते तर चांगले राहिले असते. कारण सकाळच्या नऊ वाजेच्या वेळेमुळे दोन सत्रातील श्येड्यूल आता विस्कळीत होणार आहे.
-चंद्रकांत भंडारी, शिक्षण अभ्यासक.
खरं सांगू?...
अतिशय उत्तम निर्णय आहे.बालवयातल्या मानसिकतेच्यादृष्टीने हा निर्णय स्तुत्य आहे. पालक सकाळी सहा वाजेपासून त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही मुलं रडतात. इच्छा नसताना रिक्षात बसतात. त्यामुळे घरातील शांतताही बाधीत होते.
-डॉ.प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ