तुमची ती युती, आमची ती अभद्र युती कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:08+5:302021-03-23T04:17:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तुमचे नगरसेवक शिवसेनेत आले तर ती अभद्र युती आणि अडीच वर्षांपूर्वी तुम्ही दुसऱ्या पक्षातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तुमचे नगरसेवक शिवसेनेत आले तर ती अभद्र युती आणि अडीच वर्षांपूर्वी तुम्ही दुसऱ्या पक्षातून नगरसेवक फोडून सत्ता आणली ती भद्र युती होती का, असा सवाल करीत जळगाव महापालिका शिवसेनेचे अनंत जोशी यांनी भाजप आमदार सुरेश भोळे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. तसेच सुरेश भोळे यांची स्थिती शोले चित्रपटातील हरिनाम न्हाही यांच्या सारखी झाली असून, प्रत्येक कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे.
शिवसेनेच्या महापौरांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, मनपा विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात सोमवारी शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुरेश भोळे यांनी केलेल्या आरोपांना व केलेल्या दाव्यांना जोशी यांनी उत्तर दिले आहे. शनिवारी आमदार भोळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘गरीब की बीवी सबकी भाभी’ या म्हणीचा वापर करून गरिबांचा व महिलांचा अपमान केला आहे. त्यांचा मी निषेध करतो, असेही जोशी यांनी सांगितले. आमदार भोळे यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नये त्यांच्यासोबत भाजपात असलेले आजही अनेक जण दुसऱ्या पक्षांमध्ये फिरून आले आहेत. त्यांचे चार नगरसेवक, तर घरकुल घोटाळ्यात दोषी असल्याने नैतिकता दाखवून आमदारांनी त्यांचे राजीनामे घ्यावे, अशी मागणी जोशी यांनी केली.
२५ कोटींच्या निधीत आमदारांनी आणली आडकाठी
आमदार भोळे यांनी शिवसेना महापौरांनी दुसऱ्या मजल्यावरून दालन सतराव्या मजल्यावर नेण्यासदेखील आक्षेप घेतला होता. कुठल्या मजल्यावरून काम करायचे यापेक्षा तुमच्या ‘वरच्या मजल्या’त काय आहे. त्याला महत्त्व असल्याचा टोलाही जोशी यांनी लगावला. विकासाच्या गोष्टी करणाऱ्या आमदार भोळे यांनी २५ कोटींचा निधी खर्च करण्याबाबत आडकाठी आणण्याचे काम केले. महापौर घरात असताना २५ कोटींचे नियोजन केले नाही, मोठंमोठे आकडे फुगवून सांगितले जाते, १०० कोटींचे नियोजन करता आले नाही. दिशाभूल करण्याचे काम त्यांनी थांबवावे, अमृत योजनेचे श्रेय आमदार भोळे यांनी घेऊ नये या योजनेच्या मंजुरीत आमदार भोळे यांचे योगदान शून्य असल्याचा आरोपही जोशी यांनी केला.
आमदारांना समांतर रस्ते व महामार्ग चौपदरीकरणातील फरक समजत नाही
समांतर रस्ते आम्ही आंदोलने केली. जनआंदोलने केलीत. सध्या जळगावात महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. पण आमदार भोळे यांना समांतर रस्ते व महामार्ग विस्तारीकरणाचा फरक कळत नाहीत. हुडको कर्ज भरायची गरजच नव्हती. तत्कालीन महापौर नितीन लढ्ढा, रमेशदादा जैन हे पैसे न भरण्यासाठी लढत होते. मात्र, आमदारांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले, श्रेय घेण्यासाठी चमकोगिरी केली व १२५ कोटींची रक्कम जळगावकरांच्या माथी मारल्याचा आरोपही जोशी यांनी केला. पिंप्राळा व शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या उभारणीच्या निधीतदेखील आमदार भोळेंचे योगदान नाही. आमदार भोळे कायम ३५ वर्षांत आम्ही काय केले, असे विचारतात, मग त्यांनी गेल्या सात वर्षात आमदार असताना काय बोंब पाडली? ७ टक्के तरी रस्ते केले काय, असा सवालही त्यांनी केला. नगररचना विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मी आंदोलन केले तेव्हा याच आमदारांनी प्रशासनाला माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोपही जोशी यांनी शेवटी केला.