अडचणींचा डोंगर असताना कसे चालणार वैद्यकीय महाविद्यालय ?

By admin | Published: February 14, 2017 01:07 AM2017-02-14T01:07:35+5:302017-02-14T01:07:35+5:30

जळगाव : जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कसे चालेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

How do the medical colleges run at the beaches of problems? | अडचणींचा डोंगर असताना कसे चालणार वैद्यकीय महाविद्यालय ?

अडचणींचा डोंगर असताना कसे चालणार वैद्यकीय महाविद्यालय ?

Next


जळगाव : जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू असल्यातरी जिल्हा रुग्णालयच विविध समस्यांना तोंड देत असल्याने हे महाविद्यालय येथे कसे चालेल व विद्यार्थी कसे घडतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  
कोठेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे झाल्यास तेथील शासकीय रुग्णालयांचा आधार घेतला जातो. मात्र जळगावातील जिल्हा रुग्णालय यासाठी सज्ज नसल्याची स्थिती आहे. 
संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्या असून सुविधांचा प्रश्न बिकट आहे. येथे साधनसामुग्री, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ यासह जागेचाही प्रश्न आहे. त्यामुळे येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे असल्यास प्रथम अपूर्ण बाबींची पूर्तता करावी लागणार असल्याचे जाणकार सांगत आहे.
बाल विभागाचेही काम रखडले
 बालविभागात सध्या 16 खाटा आहेत. कधी कधी एका खाटेवर दोन बालकांना टाकावे लागते. ते टाळण्यासाठी या विभागात आणखी 16 खाटांचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 17 ते 18 लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र त्यास मंजुरी मिळणे बाकी आहे. नवीन इमारत सुरु झाली, त्यासाठी मनुष्यबळ मंजूर झाले, परंतु तेही कागदावरच आहे. प्रत्यक्षात कर्मचारी मिळालेलेच नाहीत.  
प्रयोग शाळेचा अभाव
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाला सुरुवात करून एमबीबीएसचे प्रथम वर्ष जरी सुरू केले तरी त्यासाठी लागणा:या प्रयोग शाळा (लॅब) येथे नाही. प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी डिसेक्शन हॉल, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री यासाठी तरी किमान प्रयोग शाळा लागतेच. मात्र तेच येथे उपलब्ध नाही.
सिटीस्कॅन कार्यान्वित कधी होणार?
जिल्हा रुग्णालयात आधीच विविध समस्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिटीस्कॅनची सोय नसलेल्या जिल्हा रुग्णालयाला 3 कोटी 41 लाख रुपयांचे सिटीस्कॅन मशिन मिळाले तर आहे, मात्र  ते बसविण्याचे काम पूर्ण न झाल्याने हे सिटीस्कॅन मशिन रुग्णसेवेत येण्याची प्रतीक्षा कायम आहे.
दिलेल्या साधनांचा उपयोग नाही
जिल्हा रुग्णालयात गरजू रुग्णांना चांगले व मोफत उपचार मिळावे म्हणून रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्यावतीने 2012मध्ये 15 लाख रुपये किंमतीची विविध साधनसामग्री देण्यात आली होती. मात्र यातील कृत्रिम श्वासोश्वास (व्हेंटीलेटर) या उपकरणाचा वापरच नाही. त्यामुळे विद्यार्थी  काय शिक्षण घेऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रसूती कक्षाचे काम अपूर्ण
प्रसूती कक्षामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. तेथे खाटा कमी पडत असल्याने हा कक्ष अद्ययावत करण्यात येणार आहे. त्याचेही काम पूर्ण नाही.
आयुष रुग्णालयाचे काम मार्गी लागेना
जिल्हा रुग्णालयात सध्या कमी जागेमध्ये आयुष (आयुव्रेदिक, युनानी, होमिओपॅथी, योग) उपचार सुरू आहे. याची मर्यादा वाढविण्यासाठी राज्यात सहा ठिकाणी आयुष रुग्णालयांना मंजुरी मिळाली आहे. त्यात जळगावचाही समावेश असल्याने जागेअभावी व इतर कोणत्याही कारणाने ते परत जाऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालय परिसरातच एका स्वतंत्र इमारतीत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे 50 खाटांचे आयुष रुग्णालय येथे सुरू होऊ शकते. मात्र इमारतीचे काम झाले नसल्याने हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अगोदरच येथील या समस्या मार्गी लागत नसल्याने व पुरेसी यंत्रसामुग्री नसल्याने येथे वैद्यकीय महाविद्यालय कसे सुरू होईल व विद्यार्थी कसे घडले जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महिला रुग्णालयाची प्रतीक्षा
 पूर्वीपेक्षा जिल्हा रुग्णालयील खाटांची संख्या वाढली असली तरी स्टाफ आहे तेवढाच आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचा:यांवर ताण वाढण्यासह जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढून रुग्णसेवेवरही परिणाम होतो, मात्र आहे तेवढय़ा स्टाफमध्ये चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो.
 रुग्णालयातील हा वाढता ताण पाहता मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय सुरू होणार असून त्यासाठी 82 कोटी रुपये मंजूरदेखील झाले आहे. त्याचे काम होऊन जिल्हा रुग्णालयातील ताण बराच कमी होऊ शकेल. मात्र याचा आराखडा वित्त विभागात अडकला  आहे.
पुरेशी इमारत नाही
 या सर्व सुविधांची येथे पूर्तता करायची झाली तरी येथे पुरेशी इमारत नाही. आहे त्या इमारतीमध्ये खाटांची संख्या वाढविता येणार नाही की प्रयोग शाळा सुरू करता येणार नाही.
रुग्णांनाच पडतात खाटा अपूर्ण
 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे झाल्यास संबंधित रुग्णालय 750 खाटांचे असावे लागते. मात्र जिल्हा रुग्णालयात केवळ 400 खाटा आहेत. त्यात येथे  आलेल्या रुग्णांनाच  खाटा (कॉट) अपूर्ण पडतात. त्यामुळे शासकीय रुग्णालायासाठी खाटांची पूर्तता कशी होईल असा प्रश्न आहे.

Web Title: How do the medical colleges run at the beaches of problems?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.