शत्रुत्वाच्या जखमा भरुन कशा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:10 PM2019-11-03T12:10:04+5:302019-11-03T12:22:44+5:30

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना हे काँग्रेस आघाडीपेक्षा परस्परांविरुध्द १४ ठिकाणी लढले, धुळे-नंदुरबारमधील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अंतर्गत वादाचे पडसाद उमटणार

How to get rid of hostile wounds? | शत्रुत्वाच्या जखमा भरुन कशा निघणार?

शत्रुत्वाच्या जखमा भरुन कशा निघणार?

Next

मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑातील विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना हे युती करुन लढले, परंतु ही युती मनापासून होती की नाईलाज म्हणून केली गेली असा प्रश्न उपस्थित व्हावा, असे दोन्ही पक्षांमधील वातावरण व वर्तन होते. मुंबईतील पंतप्रधानांच्या उपस्थितीतील शेवटची सभा सोडली तर युतीचे नेते एकत्रितपणे प्रचार करताना दिसले नाही. एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी आणि बंडखोरी केल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण झाली. काहीचे वाद तर पोलीस स्टेशनपर्यंत गेले. आघाडीशी लढण्याऐवजी एकमेकांशी लढल्याने शक्तीपात झाला तो वेगळाच.
भाजप-शिवसेनेचे संबंध २०१४ पेक्षाही अधिक ताणले गेले आहेत. मुंबईत हे पक्ष एकत्र आले तरीही गावपातळीवर या दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट कायम राहील. शिवसेना कधी नव्हे ते आक्रमक झाली आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. खान्देशातील २० जागांपैकी सेनेने ६ तर भाजपने १४ जागा लढविल्या होत्या. या जागावाटपाविषयी कोणतीही खळखळ, नाराजी उघडपणे व्यक्त झाली नाही, याचा अर्थ परस्पर सामंजस्याने हे जागावाटप झाले. परंतु, सेनेच्या सर्व ६ जागांवर भाजपकडून बंडखोरी झाली. त्याचा फटका नंदुरबार-धुळे जिल्ह्यात बसला. सेनेला खाते उघडता आले नाही. पण भाजपचे संख्याबळदेखील वाढले नाही. जैसे थे राहिले. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिंदखेडा मतदारसंघात केलेली बंडखोरी भाजप व जयकुमार रावल यांच्या जिव्हारी लागली. ते निवडून आले, पण प्रयत्न करावे लागलेच.
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरात जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची बंडखोरी राज्यभर खळबळ उडवून देणारी ठरली. अर्थात जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि राष्टÑवादी काँग्रेसने त्यांना समर्थन दिले.
अतीशय चुरशीच्या लढतीत पाटील यांनी बाजी मारली. मात्र सेनेच्या चार अधिकृत उमेदवारांना भाजप बंडखोरांनी भंडावून सोडले . पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांना अमोल शिंदे यांनी अखेरपर्यंत झुंजवले. जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द शेवटच्या टप्प्यात बंडखोर गटाने आरोपांची राळ उठवली. चोपडा आणि एरंडोलमध्ये वेगळे चित्र नव्हते. परंतु, चौघे उमेदवार हे अनुभवी आणि निवडणूक तंत्र अवगत असल्याने तोडीस तोड ठरले. सेनेचा स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला आणि मुक्ताईनगर हा बोनस ठरला. याउलट भाजपच्या जागा दोनने घटल्या आणि रोहिणी खडसे, हरिभाऊ जावळे, शिरीष चौधरी यांच्या पराभवामुळे भाजपच्या अंतर्गत असलेली बेदिली, मतभेद, संशयकल्लोळ ठळकपणे समोर आला.
काँग्रेस आणि राष्टÑवादीला एकेक जागा मिळाली, तीही भाजपच्या अंतर्गत मतभेदाचा फायदा मिळाल्यामुळे हे तर उघड आहे. चाळीसगावात राजीव देशमुख-मंगेश चव्हाण, जामनेरात गिरीश महाजन-संजय गरुड, जळगावात सुरेश भोळे-अभिषेक पाटील, धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील-ज्ञानज्योती भदाणे, नंदुरबारमध्ये डॉ.विजयकुमार गावीत-उदेसिंग पाडवी, शहाद्यात पद्माकर वळवी-राजेश पाडवी अशा ६ ठिकाणी फक्त युती आणि आघाडी असा सामना रंगला. उर्वरित १४ मतदारसंघात युती अंतर्गत किंवा भाजप अंतर्गत लढाई झाली. त्याचे परिणाम आता दीर्घकाळ राहणार आहेत, हे उघड आहे.
नंदुरबार-धुळे जिल्ह्यात सेनेला यंदाही खाते उघडता आले नाही. अक्कलकुव्याची जागा थोडक्यात गेली. धुळे आणि अक्कलकुवा या दोन्ही ठिकाणी भाजप कार्यकर्त्याकडून बंडखोरी झाली. शिवसेनेने शिंदखेड्यात जयकुमार रावल यांच्याविरोधात बंडखोरी केली. याचे पडसाद आगामी जि.प. व पं.स.निवडणुकीत उमटल्याशिवाय राहणार नाही. अमरीशभाई पटेल, शिवाजीराव दहिेते, चंद्रकांत रघुवंशी यांच्या पक्षांतरामुळे भाजप-सेना प्रबळपणे एकमेकांविरुध्द लढतील.

Web Title: How to get rid of hostile wounds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.