पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:41+5:302021-05-12T04:16:41+5:30

योगा, प्राणायाम, गायन व लसीकरणावर देताहेत भर जळगाव : गेल्या वर्षभरापासून सर्वावरच कोरोनाचे संकट कोसळले आहे. त्यातल्या त्यात जनतेचा ...

How to get rid of mental fatigue of police and health workers? | पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

Next

योगा, प्राणायाम, गायन व लसीकरणावर देताहेत भर

जळगाव : गेल्या वर्षभरापासून सर्वावरच कोरोनाचे संकट कोसळले आहे. त्यातल्या त्यात जनतेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करणारे आरोग्य व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी प्रचंड तणाव, नैराश्यात कार्य करीत आहे. एकीकडे कुटुंब तर दुसरीकडे कर्तव्य अशा द्विधा मन:स्थितीत अडकलेली ही यंत्रणा अहोरात्र झटत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हा धोका लक्षात घेऊन प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा अंमल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही यंत्रणा त्याचे पालन करीत आहे. आरोग्य यंत्रणाही याच त्रिसूत्रीचा वापर करीत आहेत. किंबहुना त्यांचा थेट रुग्णांशी संपर्क येत असल्याने याहीपेक्षा अधिक दक्ष राहून धोका कसा टाळता येईल याची खबरदारी घेत आहेत. पोलीस व आरोग्य यंत्रणेत मास्क, सॅनिटायझर यासह इतर अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.

लसीकरण, योगा, प्राणायामातून तणावमुक्तता

सर्वात आधी कोरोनाची भीती दूर व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलिसांचे लसीकरण करण्यावर भर दिला व त्याची ९६ टक्के अंमलबजावणी करण्यात आली. त्याशिवाय योगा, प्राणायाम, गायन व व्यायाम यातून पोलीस आपला थकवा घालवून मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचे दोन्ही डोस कसे पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका व इतर स्टाफ हेदेखील योगा प्राणायाम करून मानसिक थकवा घालवत आहेत.

जिल्ह्यातील एकूण पोलीस : ३,२२३

एकूण पोलीस अधिकारी : १९६

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी : २,२००

एकूण डॉक्टर : १५०

पोलिसांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी सर्वात आधी तणावमुक्त राहून ड्यूटी केली जात आहे. भीती दूर करण्यासाठी ९६ टक्के पोलिसांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचा फायदा असा झाला की या लाटेत कोरोना पॉझिटिव्ह लोकांशी संपर्क येऊनही पोलीस निगेटिव्ह आहेत.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

कुटुंब अन् नोकरी सांभाळण्याची कसरत

ड्यूटी करीत असताना लोकांशी बऱ्याच वेळा वादविवाद होतात. आधी प्रेमाने समजावून सांगावे लागते. एखाद्याने ऐकलेच नाही तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी लागते. दिवसभरात जास्त वेळा वाद झाले तर त्याचा परिणाम कुटुंबात नक्कीच जाणवतो. घरी गेल्यावर कुटुंबालादेखील कोरोनाची भीती वाटते.

- अशोक पवार, हवालदार

व्यायाम, योगा, कराटे मानसिक थकवा घालविण्याचे काम करते. महिला असल्याने कुटुंब आणि ड्यूटी या दोघांमध्ये मोठी कसरत करावी लागते. कोरोनामुळे तर आधी कर्तव्य व नंतर कुटुंब अशी परिस्थिती आहे.

- अश्विनी निकम, महिला पोलीस

मानसिक थकवा घालवण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. रोज प्राणायाम, मेडिटेशन, संतुलित आहार व सकाळी लवकर उठून प्रसन्न वातावरणात बाहेर फिरले पाहिजे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आमच्याकडून याच सूचना दिल्या जातात आणि सर्व जण त्याचे पालन करतात.

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

कोरोनाच्या काळात काम करताना खूपच काळजी घ्यावी लागत आहे. मानसिक संतुलन नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम नियमित केला जातो. कुटुंब व ड्यूटी यात कसरत होते; परंतु नाइलाज आहे ड्युटी करावी लागते.

- आशा पाटील, परिचारिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

शासकीय रुग्णालय सध्या कोविड रुग्णालय झालेले आहे. त्यामुळे येथे सर्व संशयित व बाधित रुग्ण असतात. अविरत सेवा द्यावी लागत असल्याने नक्कीच त्याचा कुटुंबावर परिणाम होत आहे. असे असले तरी संपूर्ण कुटुंबात सकारात्मक वातावरण आहे.

- विजय बाविस्कर, परिचर, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय

सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला ज्ञान पूर्ण हवे, दुसरी बाब म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नये, मास्क नीट वापरावा, किट वापरावे, वेळेचे नियोजन करावे, पूर्ण झोप घ्यावी. आहार व्यवस्थित घ्यावा, तुमची तब्येेत चांगली राहिली तर तुम्ही रुग्णांना बरे कराल. डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी या दिवसांत घेतली गेली पाहिजे. सकारात्मक राहावे.

- डॉ. दिलीप महाजन, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: How to get rid of mental fatigue of police and health workers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.