रुग्ण ठेवायला नाही ‘बेड असिस्टंट’ संकल्पना कशी राबवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:24 PM2020-09-21T18:24:58+5:302020-09-21T18:28:52+5:30
कोविड रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबवली जात आहे.
मतीन शेख
मुक्ताईनगर : कोविड रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबवली जात आहे. येथील कोविड रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात रुग्ण ठेवण्यासही जागा नसल्याने सध्या रुग्णांना ‘बेड असिस्टंट’ ठेऊ दिले जात नाही. वयोवृद्ध रुग्णांसाठी व अपवादात्मक स्थितीत नातेवाईकास पूर्वपरवानगीने कोविड कक्षात प्रवेश दिला जात आहे.
अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत कर्मचारी व वार्ड बॉय यांचा व्यवहार सकारात्मक नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून होत होत्या. मधल्या काळात रुग्णांना वेळोवेळी देण्यात येणाऱ्या गोळ्या कक्षात नेमणूक असलेल्या कर्मचार्यांनी फेकून दिल्याने जिल्हा स्तरावरील रुग्णालयात वादंग झाला होता. कर्मचाऱ्यांमध्येही कोविडची भीती व त्यातून अनाहूतपणे रुग्णालयात रुग्णांसोबत घडणारे प्रकार पाहता आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णांकरिता रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे.
रुग्णांनाच जागा अपूर्ण
दरम्यान, मुक्ताईनगर येथील कोविड डेडिकेटेड कक्षात क्षमतेपेक्षा जास्त असे ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. अशात या ठिकाणी रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबविण्यास वाव नाही. मूळात रुग्णांना जागा नाही. अशात रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ला कक्षात जागा कशी देणार, हा प्रश्न उभा राहिला आहे.
पूर्वपरवानगीची गरज
कोविड डेडिकेटेड कक्षात रुग्णांकरिता जेवण-चहा पाण्याची व्यवस्था केली जात आहे. अशात काही रुग्णांना घरचे जेवण घ्यायचे असल्यास पूर्वपरवानगीने रुग्णाच्या एका नातेवाईकांस कोविड कक्षात सोडले जात आहे, तर वयोवृद्ध रुग्णांच्या गरजेनुसार फक्त एका नातेवाईकाला तातडीच्या गरजेवेळी कक्षाच्या आत जाण्यास मुभा दिली जात आहे. सध्या चार ते पाच रुग्णांचे नातेवाईक डबा देण्यास येतात.
नातेवाईकांनाही भीती
कोरोना संकट काळात घरातील एखादे सदस्य पॉझिटिव्ह निघाले तर संपूर्ण घर क्वारंटाईन होत आहे. घरातील एखाद दुसरी व्यक्ती यातून बाहेर असली तरच कोविड कक्षात उपचार घेणाºया रुग्णांपर्यंत जाऊ शकतो. नसेल तर जवळच्या नातेवाईकांनाही भीती असते. त्यामुळे बहुसंख्य नातेवाईक दूर राहणे पसंत करतात तर अपवादात्मक परिस्थितीत रुग्णाच्या घरातील सदस्य काळजी घेतात. तुलनात्मकदृष्ट्या अशी संख्या फारच कमी आहे.
डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व शहरातील अन्य कोविड सेंटरवर रुग्ण ठेवण्यास जागा अपूर्ण पडत आहे. अशात रुग्णांची काळजी घेण्यासाठी बेड असिस्टंट ठेवण्यास वाव नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र रूग्णांना सेवा देत आहे.
-डॉ.नीलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुक्ताईनगर