शरद पवारांची मुत्सद्देगिरी तर एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
By विलास.बारी | Published: June 27, 2023 05:30 PM2023-06-27T17:30:14+5:302023-06-27T17:30:46+5:30
आमचे फेसबुकवाले नव्हे तर जनतेत जाणारे सरकार
जळगाव : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते व खासदार शरद पवार यांनी ४० आमदारांना सोबत घेत १९७८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडत सरकार स्थापन केले होते. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा राजकीय मुत्सद्देगिरी म्हणून सांगितला जातो. तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केली तर ती गद्दारी कशी.
शिंदे यांचीदेखील राजकीय मुत्सद्देगिरी असल्याचे फडणवीस यांनी जळगावात केले. शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आमचे जनतेत जाणारे सरकार
गेल्या वेळेचे सरकार हे फेसबुक आणि बंद घरात राहणारे सरकार होते. मात्र आताचे सरकार हे जनतेत जाणारे सरकार आहे. सर्वसामान्यांचा विचार करणारे सरकार आहे. यावेळी त्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन योजना यासह विविध योजनांबाबत केलेल्या मदतीची माहिती दिली.
ती मुत्सद्देगिरी तर शिंदेची गद्दारी कशी
राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आमचे सरकार बेईमानीचे सरकार असल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र १९७८ साली राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी ४० आमदारांना सोबत घेत सरकार स्थापन केले होते. त्यांची मुत्सद्देगिरी होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर भाजपसोबत निवडणूक लढविले होते. आणि बंड करून आमच्या सोबत सरकार स्थापन केले. तर मग मुख्यमंत्री शिंदे यांचीदेखील ही राजकीय मुत्सद्देगिरी असल्याचा दावा त्यांनी केला.